विविध संस्था, राजकीय पक्षांचे पिंपरीत धरणे आंदोलन
पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीचे तीव्र पडसाद शहरात उमटले. काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता सर्व राजकीय पक्ष तसेच विविध संस्था, संघटनांनी आयुक्तांच्या समर्थनार्थ िपपरीत शनिवारी धरणे आंदोलन केले आणि परदेशी यांची अन्यायकारक बदली रद्द करण्याची जोरदार मागणी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परदेशी यांची बदली केली. त्या निर्णयाचे पडसाद शहरात उमटले. परदेशी यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली झाल्याच्या निषेधार्थ िपपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले.  
राजकीय पक्षांशी संबंध नसलेले सामान्य नागरिकही उत्स्फूर्तपणे आले होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा करण्यात येत होत्या. परदेशी यांची बदली अन्यायकारक असून ती रद्द करण्याची मागणी या वेळी आंदोलक करत होते. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या िपपरीतील कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान,परदेशी यांनी बदलीसंदर्भात दुसऱ्या दिवशीही कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. चिंचवडला सायन्स पार्कच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले. तेव्हा महापौर मोहिनी लांडे व पालिकेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या वेळी अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी आगामी अंदाजपत्रकाचा आढावा घेतला. तेथे आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.