पेट्रोल दरवाढीनं सामान्यांना घाम फोडला आहे. पेट्रोलच्या दरात सतत होणारी वाढ सामान्यांना न परवडणारी आहे. त्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. गेल्या काही दिवसात पेट्रोल ११० रुपयापर्यंत पोहचले आहे. तर त्या मोगोमोग डिझेलचे दर देखील १०० च्या जवळपास गेले आहेत. त्यामुळे सामान्य नोकरदार वर्ग भरडला जातोय.

दररोज नवीन विक्रम करणारे पेट्रोलचे दर रविवारी प्रतिलिटर ११०.१४ रुपयांवर पोहचले. त्याचबरोबर प्रीमियम पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ११३.२९ रुपये झाली आहे. यावर्षी जानेवारीपासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १८.२६ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या , राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारची फीरकी घेतली आहे.

आणखी वाचा- इंधन दरवाढीविषयी रोहित पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार, म्हणाले…

“पूर्वी लोक कामावर जाण्यासाठी पेट्रोल भरायचे… आज काल लोक पेट्रोल भरता यावे म्हणून कामावर जातात… #मोदी_है_तो_बर्बादी_है”,अशी फिरकी घेत रुपाली चाकणकर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील पेट्रोल दरवाढीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. “महागाईच्या ओणव्यात आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत! पण काही का असेना… यामुळं केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत!”, असे रोहित पवार म्हणाले.