जयंती साजरी करण्याच्या आदेशाने अधिकाऱ्यांची धांदल
शासकीय परिपत्रकानुसार शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती अंत्योदयदिन म्हणून साजरा करण्याचे आदेश सर्वच कार्यालयांना दिले असल्याने उपाध्याय यांची प्रतिमा मिळविण्यासाठी गुरुवारी शासकीय अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू होती. उद्या बकरी ईदची सुटी असल्याने हा ‘अंत्योदय दिन’ कसा साजरा करावयाच्या विवंचनेत हे अधिकारी दिवसभर होते.
विविध लोकोत्तर कार्य करणाऱ्या महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दरवर्षी परिपत्रक देण्यात येते. या परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयात संबंधित महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करण्याचा प्रघात आहे. चालू वर्षीच्या महापुरुषांच्या यादीत तत्कालीन जनसंघाचे अध्यक्ष पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती ‘अंत्योदय दिन’ म्हणून साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. यानिमित्त उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, पंडित उपाध्याय यांची प्रतीमा कोणत्याही शासकीय कार्यालयात उपलब्ध नसल्याने अभिवादन कसे करायचे असा प्रश्न कार्यालय प्रमुखांना पडला आहे. बाजारात उपाध्याय यांचे छायाचित्रच उपलब्ध नसल्याने शासकीय सोपस्कार कसे पार पाडायचे असा प्रश्न पडला आहे.
‘माहितीजाला’च्या संकेतस्थळावर छायाचित्राची शोधाशोध करण्यात येत असली, तरी अभिवादनासाठी प्रतिमा कशी उपलब्ध करायचे हा प्रश्न आहे.