सोलापूर : रब्बी पिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा खरीप पीक हंगामाचे क्षेत्र ३० हजार ५०८ हेक्टरने वाढून तीन लाख ७६ हजार ७२३ हेक्टर क्षेत्रात खरीप पीक हंगामाचे नियोजन कृषी खात्याने आखले आहे.

सोलापूरचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ३० वर्षांपूर्वी अवघे एक लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित होते. त्यानंतर वेळी-अवेळी आणि अनिश्चित पडणाऱ्या पावसामुळे खरीप क्षेत्रात हळूहळू वाढ होत गेली. सध्या जिल्ह्याचे सरासरी खरीप पीक पेरणी क्षेत्र दोन लाख ८९ हजार ३६९ हेक्टर एवढे आहे. मात्र प्रत्यक्षात गतवर्षी तीन लाख ४६ हजार ५०५ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदाच्या खरीप हंगामात पेरणी क्षेत्र आणखी वाढण्याची अपेक्षा असून त्यादृष्टीने कृषी विभागाने तीन लाख ७६ हजार ७२३ हेक्टर क्षेत्र पीक पेरणीचे नियोजन हाती घेतले आहे. खरीप हंगामात प्रामुख्याने मका, बाजरी, तूर, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल आदी पिकांची लागवड होते. त्यासाठी रासायनिक खतांसह बी-बियाणांचा मुबलक साठा उपलब्ध होत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने यांनी सांगितले.

हेही वाचा – सोलापूर : वाहनांची तोडफोड करताना रोखले; बार्शीत दोघा माथेफिरूंचा खुनीहल्ला

जिल्ह्यात अलिकडे सोयाबीन पिकाची लागवड झपाट्याने वाढत असून यात बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यांचा समावेश आहे. गतवर्षी सोयाबीनची लागवड एक लाख ३३ हजार २११ हेक्टर क्षेत्रात झाली होती. यंदा त्यात किंचित वाढ होऊन एक लाख ३५ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र गृहीत धरण्यात आले आहे.

हेही वाचा – मविआबाबत सहानुभूती आहे का? सुनील तटकरेंचं सूचक विधान, म्हणाले, “एक वातावरण…”

जिल्ह्यात तालुकानिहाय गृहीत धरण्यात आलेले खरीप क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे-

अक्कलकोट- एक लाख १३९८, बार्शी- ६२ हजार ७६३, दक्षिण सोलापूर- ४२ हजार ५९८, मोहोळ- ३० हजार १२२, सांगोला- २७ हजार ६०५, उत्तर सोलापूर- २६ हजार ८३३, करमाळा- २२ हजार ६४१, पंढरपूर- २२ हजार २५४, मंगळवेढा- १८ हजार ९६३, माढा- १५ हजार ९९७ आणि माळशिरस- ५५४७ याप्रमाणे एकूण तीन लाख ७६ हजार ७२३ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरण्यांचे नियोजन आखण्यात आले आहे.