विजय राऊत
जागोजागी गुडघाभर खड्डे; पहिल्या पावसानंतर दुरुस्तीच नाही
तलासरी तालुक्यातील महाराष्ट्र-केंद्रशासित प्रदेशाला जोडणाऱ्या प्रादेशिक जिल्हा मार्गाची खड्डय़ांमुळे दैन्यावस्था झाली आहे. कोचाई बोरमाळ हद्दीतील प्रादेशिक जिल्हा मार्ग पहिल्याच पावसात जागोजागी खचला होता. त्यानंतर या मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. महाराष्ट्र-केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवरील कोचाई बोरमाळ गावातून जाणाऱ्या प्रादेशिक जिल्हा मार्ग असलेल्या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. अनेकदा तलासरी परिसरातील आदिवासी रोजगारासाठी केंद्रशासित प्रदेश आणि गुजरातमध्ये जातात.
मार्गावर खड्डे आहेतच, परंतु त्यांची तळी झाली आहेत. मार्गावरील पूल आणि मोऱ्यांवरील डांबर वाहून गेले आहे. यामुळे अपघातांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा मार्ग याआधी पंचायत समिती बांधकाम विभागाअंतर्गत येत होता, परंतु दोन वर्षांपूर्वी या मार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी तयार केलेला रस्ता यंदाच्या पावसात वाहून गेला आहे. मार्गाचे काम निकृष्ट पद्धतीने करण्यात आले आहे. काही मोरीवरील सिमेंटचे पाइप फुटले आहेत. रस्त्याच्या मधोमध दीड ते दोन फूट खोल खड्डे पडले आहेत. काही ठिकाणच्या मोरी आणि नाले तुटले आहेत. मोठय़ा खड्डय़ांमध्ये पाणी साचले आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ठराव घेऊन मार्ग तयार करण्यासाठी मागणी केल्याचे कल्पेश अहिर यांनी सांगितले.
कोचाई बोरमाळ जिल्हा मार्गावर खड्डे पडले असल्यास ते बुजविण्यासाठी आदेश देण्यात येतील. याशिवाय केंद्रशासित प्रदेशाला जोडणाऱ्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. पावसाळ्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल.
-राजेंद्र चव्हाण, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग