लोकसभा निवडणूक या किंवा पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते अशी परिस्थिती आहे. अशात भाजपाच्या प्रचारसभा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रात अमित शाह यांचा दौरा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राज्यात येतील. या सगळ्या वातावरणात एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे भाजपासह जातील का? याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे शिंदे गटाच्या आमदाराने केलेलं वक्तव्य. शिंदे गटाच्या आमदाराने एक हजार टक्के खात्रीने सांगितलं आहे की उद्धव ठाकरे भाजपासह जातील आणि लवकरच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचारसभा सुरु झाल्या आहेत

लोकसभा निवडणुकीला काही दिवसच राहिले आहेत. इंडिया आघाडी देशात आणि महाविकास आघाडी राज्यात अशी विरोधकांची आघाडी आहे. त्या आघाडीत उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष आणि काँग्रेस आहे. उद्धव ठाकरेंच्या प्रचारसभाही जोरात सुरु आहेत. २०१९ मध्ये जेव्हा भाजपासह त्यांनी निवडणूक लढवली होती, त्या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरुन दोन्ही पक्षात टोकाचा संघर्ष झाला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या समीकरणाची महाविकास आघाडी अस्तित्वात आली.

महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं आहे

हे सगळं घडलं असलं तरीही २०२२ मध्ये शिवसेनेत बंड झालं आणि २०२३ मध्ये राष्ट्रवादीत बंड झालं. या सगळ्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण एक प्रकारे ढवळून निघालं आहे. लोकसभेचे निकाल काय लागतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. अशात शिंदे गटाच्या आमदाराने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट होईल आणि ते भाजपासह येतील असा दावा छातीठोकपणे केला आहे. हे आमदार दुसरे तिसरे कुणीही नसून शहाजी बापू पाटील आहेत. काय झाडी, काय डोंगार काय हाटेल.. ओके मध्ये आहे सगळं या फोनमुळे ते महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. त्यांनी आता उद्धव ठाकरे भाजपासह येतील असा दावा केला आहे.

हे पण वाचा- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? संजय राऊत म्हणाले, “ती वेळ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले शहाजीबापू पाटील?

एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज तुम्हाला सांगतो. आपला अंदाज चुकणार नाही. दिवस कुठला ते बघावं लागेल. पण हे व्हावंच लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे. हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही. पंतप्रधान मोदींकडे उद्धव ठाकरेंना जावं लागण्याचा दिवस येणार आहे. लवकरच येणार आहे, राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळं वातावरण आहे. अशा वातावरणात जर उद्धव ठाकरेंनाही वाटलं की आपणही भाजपासह जावं तर त्यात गैर काही नाही. महायुतीला लोकसभा निवडणुकीत ४५ जागा मिळतील असाही दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत शहाजी बापू पाटील यांनी हा दावा केला आहे.