पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशातील सर्व सामान्य जनतेशी साधलेला संवाद ही चांगली बाब असून या संवादा शिवाय लोकशाही बळकट होऊ शकत नाही. सशक्त लोकशाहीसाठी ‘मन की बात’सारखा संवादाचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालगंधर्व रंगमंदिरात नवभारत निर्मिती संकल्प सिध्दी आणि भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या मराठी अनुवादीत पुस्तकाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार विनय सहस्रबुध्दे, खासदार अनिल शिरोळे, भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले आदी मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होती.

सी. विद्यासागर राव म्हणाले, ‘मन की बात’ कार्यक्रम सामान्य जनता आणि सरकार यांच्यात सेतूचे काम करत आहे. देशाच्या नवनिर्मितीसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेला कामाची प्रेरणा मिळते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रमही सरकार आणि सत्ताधाऱ्यांच्या संवेदनशीलतेचे प्रतिक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. हा कार्यक्रम स्तुत्य आहे. मन की बात हा कार्यक्रम मराठी सारख्या प्रादेशिक भाषेत पुस्तक स्वरूपात अनुवादित करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे पंतप्रधानांचे विचार व्यापक स्वरूपात सामान्य लोकांपर्यंत पोहोचतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

२०२२ पर्यंत १ लाख मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट
राजभवन परिसरात १ मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटनही रविवारी करण्यात आले. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ऊर्जा टंचाईवर मात करण्याचे प्रयत्न करीत असतानाच आपण स्वच्छ, शाश्वत ऊर्जा स्त्रोतांचा वापर करायला हवा. तसेच आपल्या देशातील लोकांची आणि औद्योगिकरणाची वाढती गरज भागविण्यासाठी आपल्याला सौरऊर्जेकडे वळावेच लागेल, असे मत त्यांनी मांडले. राष्ट्रीय सोलर मिशनच्या अंतर्गत २०२२ पर्यंत २० हजार मेगावॉटवरून १ लाख मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi mann ki baat important for democracy says maharashtra governor vidyasagar rao
First published on: 05-11-2017 at 16:38 IST