बीड जिल्ह्यात दौलावडगाव ( ता. आष्टी) येथे गाय आणि बैलाची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने हा प्रकार उघडकीस आणली. गुरूवारी (२४ फेब्रुवारी) पहाटे ही कारवाई करण्यात आली. यावेळी साडेसहा लाख रुपयांचे मांस आणि वाहने मिळून तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एकूण ११ आरोपींवर अंभोरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दौलावडगाव येथील खलील कुरेशी आणि दलील कुरेशी हे दोघे डोंगराच्या पायथ्याला पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना तयार करून गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने या ठिकाणी छापा मारला.

हेही वाचा : बीडमध्ये परळीत बहिण-भावाची हत्या, तर माजलगावमध्ये शिक्षकासह तिघांची आत्महत्या

यावेळी आयशर टेम्पो क्र. (एम.एच. २३ डब्ल्यू ३९८३) पाहणी केली. त्या टेम्पोत व शेडमध्ये ४० जनावरांची कत्तल करून तयार केलेले पाच टन मांस आढळले. त्याची किंमत ६ लाख २० हजार इतकी आहे. याशिवाय ४ लाखांचा टेम्पो, मजुरांना येण्या-जाण्यासाठी लागणारी ३ लाख रूपयांची कार असा एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.