|| शफी पठाण
संमेलनाच्या मांडवातून :- पोलीस आणि साहित्यिक यांचा एकत्र वावर ही तशी अपवादात्मक गोष्ट. पण, उस्मानाबादेतील साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला अचानक खास ठेवणीतले मोबाइल संदेश पुन्हा बाहेर निघाले आणि चोर-दरोडेखोरांच्या पंचनाम्यात गुंतलेल्या पोलिसांना ठाणे सोडून सारस्वतांच्या मांडवात दाखल व्हावे लागले. खादी कोशाचे रंगीबेरंगी झबे घातलेल्या साहित्यिकांच्या या मेळ्यात हे खाकीधारी का? कुणाला कळेचना. विचारपूस, फोनाफोनी सुरू झाली. संमेलनाध्यक्ष, उद्घाटक, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धमकीचे संदेश येत असल्याचे कळले आणि मांडवातला नूरच बदलला. ही अस्वस्थता सोबत घेऊनच त्यांची पावले ग्रंथदिंडीच्या दिशेने पडू लागली. तिथे पोहोचताच जे दिसले त्याने या अस्वस्थतेत आणखी भर घातली. कारण, इथेही साहित्य पालखीचे धूरकरी कमी आणि पोलीसच जास्त दिसत होते. खुद्द कौतिकराव ठाले पाटील, प्रा. मिलिंद जोशी यांना पोलिसांचा गराडा पडला होता. त्यांना असे सुरक्षाकडय़ात पाहून अनेकांना संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची काळजी वाटू लागली. उद्घाटक ना.धों. महानोरांबाबतही विचारणा सुरू झाली. पण, ते काही दिसत नव्हते. येथे शिवरायांच्या स्वराज्य निर्भयतेचे प्रतीक असलेले भगवे झेंडे डौलाने फडकत होते. आंबेडकरांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या हाती अभिव्यक्तीचा पुरस्कार करणारे भारतीय संविधानही दिसत होते. पण, वातावरणात एक अदृश तणाव कायम होता. कुठून एखादा जमाव नारे देत समोर आला तर? संदेशातली धमकी वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न झाला तर?, असे प्रश्न जसे सारस्वत, रसिकांना जसे चिंतेत टाकत होते तसेच ते पोलिसांनाही सतर्क राहण्यास बाध्य करीत होते. पालखीपर्यंत जाणाऱ्या प्रत्येक नवीन माणसाकडे पोलिसांच्या सांशक नजरा स्थिरावू लागल्या. वेळ हळूहळू पुढे सरकली अन् अखेर पालखी संमेलनस्थळाच्या दिशेने मार्गस्थ झाली. संभाव्य संकटाचे पहिले सत्र टळले होते. पण खरी परीक्षा पुढे होती. संमेलनाच्या उद्घाटनाची वेळ जवळ येत होती. लोकांची गर्दी वाढत होती तसतशी मंडपभर पोलीस पेरणी सुरू झाली होती. प्रवेशद्वारावरच्या स्वयंसेवकांची जागा पोलिसांनी घेतली होती. धमकीची दखल खुद्द गृहमंत्र्यांनी घेतल्याने पोलिसांची पापणीही हलत नव्हती. संमेलनाचे उद्घाटन, पुढे सूत्रप्रदान सोहळा आणि संमेलनाध्यक्षांचे भाषण सुरू होऊन ते संपेपर्यंत पोलिसांची खंडित साखळी मांडवाच्या सभोवताल स्पष्ट जाणवत होती. एकदाचे उद्घाटन संपले अन् ती साखळी सैल झाली. गर्दी पांगायला लागली. परंतु समाजाला वैचारिक नेतृत्व देण्याची क्षमता असलेल्या व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त करण्याचा दावा करणाऱ्या संमेलनाला स्वत:च्या अभिव्यक्तीसाठी पोलिसांचा आधार घ्यावा लागला, ही खंत या गर्दीच्या मनातून सलग व्यक्त होत राहिली.