जवखेडे (ता. पाथर्डी) येथील दलितांच्या तिहेरी हत्याकांडासंदर्भात पोलिसांनी आज, गुरुवारी आणखी चौघांची नार्को टेस्टसाठी न्यायालयाकडे परवानगी मागितल्याची माहिती समजली. यामध्ये नगर शहर, भिंगार येथील कार्यकर्ते व त्यातील एकाची पत्नी तसेच जाधव कुटुंबाशी संबंधित एक जण अशांचा समावेश आहे.
या निर्घृण हत्याकांडास एक महिना पूर्ण झाला आहे, मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाथर्डीत तळ ठोकूनही आरोप पकडण्यात अपयश आले आहे. पोलिसांनी यापूर्वीही जाधव कुटुंबाशी संबंधित सहा जणांची नार्को टेस्ट करण्यासाठी परवानगी मागितली होती. यामध्ये जाधव कुटुंबाशी संबंधित व्यक्ती तसेच राजकीय पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा समवेश होता. या सहा जणांनीही तसेच न्यायालयानेही नार्को टेस्टला परवानगी दिली होती. त्यानुसार या सहा जणांना टेस्टसाठी अहमदाबादला नेण्यात आले होते. एक आठवडाभर या चाचण्या सुरू होत्या. त्यानंतर या सहाही जणांना नुकतेच पाथर्डीला पुन्हा आणण्यात आले व नंतर सोडून देण्यात आले. मात्र नार्को टेस्टचा अहवाल मात्र अजून न्यायालयाला किंवा पोलिसांना प्राप्त झालेला नाही.
पोलीस तपासात काहीच प्रगती झाली नसताना पाथर्डी पोलिसांनी पुन्हा चौघांची नार्को टेस्ट करण्यास आज पाथर्डी न्यायालयाकडे परवानगी मागितल्याचे समजले. पोलिसांच्या या मागणीवर आता सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पोलिसांना अद्याप तपासाची दिशाच सापडली नसल्याची टीका होत आहे. त्यामुळे दलित संघटनांच्या असंतोषात भर पडत आहे. त्यातून आंदोलनेही वाढू लागली आहेत.
दरम्यान आज, गुरुवारी राज्याचे अतिरिक्त गृहसचिव अमिताव रंजन यांनी जवखेडासंदर्भात नगरला भेट देत जिल्हाधिकारी अनिल कवडे व जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली, चर्चेचे स्वरूप कळू शकले नाही.