महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात बॉम्ब असल्याची माहिती मंगळवारी दुपारी (१३ ऑक्टोबर २०२१ रोजी) प्रशासनास मिळाली. यानंतर तात्काळ संपूर्ण मंदिर परिसराचा ताबा पोलिसांनी घेतला. मंदिर परिसरातील सर्व दुकाने तातडीने बंद करुन तपास करण्यात आला. या सर्व घडामोडींमुळे मंदिर परीसरामध्ये सर्वत्र निरव शांतता आणि घबराट पसरली गेली.

बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक पोलिसांच्या गाड्यांचा ताफा मंदिर परिसरात आला. सर्व दुकाने तात्काळ पोलिसांनी बंद करून घेतली. तातडीने बॉम्बशोधक पथक अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका ही दाखल झाली. भाविकांना सुरक्षित स्थळी पोलिसांनी हलवले. संशयित वस्तूंची बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली. श्वान पथकानेही संपूर्ण परिसर पिंजून काढला. सरतेशेवटी बॉम्ब नसल्याची खात्री पोलिसांना झाली आणि भाविकांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

काही काळानंतर पोलिसांकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बॉम्ब शोध मोहिमेचे मॉक ड्रिल करण्यात आल्याची माहिती उघड झाली. ही सर्व मॉक ड्रील होती हे समजल्यानंतर मंदिर परिसरातील नागरिक, भाविक यांचा जीव भांड्यात पडला. टाळेबंदीनंतर पुन्हा मंदिर सुरू झाले आहे. त्यामुळे भाविकांची पंढरपुरात गर्दी होत आहे. कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रसंगी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास या मॉक ड्रीलच्या निमित्ताने सर्वांना झाला. संबंधित मॉक ड्रिल हे पोलीस उपाधीक्षक विक्रम कदम यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अरुण पवार आणि किरण अवचर यांच्या सहकार्यातून घडलं. याप्रसंगी मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड देखील उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.