जिल्ह्य़ातील बदनापूर येथील दलित सरपंच मनोज कसाब यांच्या खूनप्रकरणी मंगळवारी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील अन्य ८ आरोपी आधीपासूनच न्यायालयीन कोठडीत असून त्यांची हर्सुल कारागृहात रवानगी झाली.
मनोज कसाब यांच्यावर ३ मे रोजी झालेल्या हल्ल्यातील ११पैकी ८ आरोपींना पोलिसांनी पूर्वीच अटक केली. किशोर चव्हाण, दिगंबर चव्हाण व कृष्णा चव्हाण या तिघांना मंगळवारी अटक झाल्यावर या तिघांना बदनापूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम. एस. कुळकर्णी यांच्यासमोर उभे केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. कसाब यांची २०१०मध्ये नानेगावच्या सरपंचपदी निवड झाली होती. ते अविवाहित होते. त्यांच्यामागे आई, वडील, ६ भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे. हल्ल्यानंतर त्यांच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर कसाब यांचा मृतदेह मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणून कारवाईची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय मंगळवारी स्थानिक सुटी असल्याने बंद होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येऊन कसाब यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे घेऊन जाण्यास सांगत कारवाईचे आश्वासन दिले.
जमावबंदीचा गुन्हा, बदनापुरात ‘बंद’
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मृतदेह आणून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून तालुका जालना पोलिसांनी २५पेक्षा अधिक व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला. कसाब यांच्या मारेकऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या तालुका शाखेच्या आवाहनानुसार बदनापूरमध्ये काही काळ ‘बंद’ पाळण्यात आला.