रायगड जिल्ह्य़ात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. विनयभंग, छेडछाड, लैंगिक अत्याचाराची तब्बल २२२ प्रकरणे गेल्या पाच वर्षांत समोर आली आहेत. ही बाब लक्षात घेऊन आता शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मंगळवारपासून रायगड पोलिसांकडून दामिनी पथक कार्यान्वित केले आहे.
जिल्ह्य़ातील २३ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा या दामिनी पथकात समावेश आहे. या महिलांना पोलीस मुख्यालयात विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात प्रामुख्याने महिला आणि मुलीवरील अत्याचार रोखण्यासंदर्भात कायदे, सायबर गुन्ह्य़ाचा तपास, संभाषणकौशल्य यांचा समावेश आहे. याशिवाय कराटे तसेच अत्याधुनिक शस्त्र वापर कसा करावा याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
हे पथक मोटरसायकलवर तनात असणार आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, समुद्रकिनारे आणि गर्दीच्या ठिकाणी ही पथके गस्त घालणार आहेत. या पथकांचे नंबर शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना उपलब्ध करून दिले जातील,
या नंबरवर संपर्क साधल्यास अवघ्या काही मिनटात दामिनी पथक घटनास्थळी दाखल होऊ शकतील. रायगड जिल्ह्य़ातील महिला दक्षता समिती सदस्यांसाठी लवकरच एक वॉट्सअ‍ॅप ग्रुप कार्यान्वित केला जाणार आहे. महिलांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. छेडछाड, विनयभंग यांसारखे प्रकार रोखणे हा या दामिनी पथकांचा मूळ उद्देश असणार आहे.
रायगड पोलीस दलाने यापूर्वी बीटमार्शल पथकात समावेश केला होता. आता महिलांच्या दामिनी पथकाची यात भर पडणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांच्या उपस्थितीत हे दल कार्यान्वित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police damini squad working in raigad
First published on: 09-03-2016 at 00:37 IST