दिल्ली विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक जी.एम. साईबाबा यांच्या विद्यापीठ परिसरातील निवासस्थानावर आज गडचिरोली व दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून नक्षलवादी चळवळीशी संबंधित महत्वाची कागदपत्रे जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. हेम मिश्रा व प्रशांत सांगलीकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईविरोधात विद्यार्थ्यांनी प्रचंड निदर्शने केली.
अबूजमाडच्या जंगलात जहाल नक्षलवाद्यांना भेटण्यासाठी जात असलेल्या हेम मिश्रा व प्रशांत सांगलीकर या दोन नक्षल समर्थकांना गडचिरोली पोलिसांनी काही दिवसापूर्वी अटक केली होती. या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई केली गेली. इंग्रजीचे प्राध्यापक असलेले साईबाबा हे दिल्लीतील विचारवंतांच्या वर्तुळात नक्षलसमर्थक म्हणून ओळखले जातात. पोलिसांनी त्यांच्या घरातून  पाच हार्डडिस्क ताब्यात घेतल्या असून यात  महत्त्वाची माहिती असल्याचे गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी सांगितले.