बेटेगाव पोलीस चौकी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेटेगाव तपासणी नाक्यावर रसायन मालवाहू ट्रक पहाटेच्या वेळी पोलिसांनी पकडला होता. मात्र अचानक ट्रक गायब झाल्याने बेटेगाव पोलीस चौकी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

रासायनिक घनकचरा भरलेला ट्रक बेटेगाव पोलीस चौकीवर १९ सप्टेंबरच्या पहाटे तपासणीसाठी अडवला होता. औद्योगिक क्षेत्रातील विविध ग्लोबल या कारखान्याचा घातक रासायनिक घनकचरा अवैधरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जाणारा हा ट्रक असल्याचे त्यावेळी उघड झाले होते. ट्रक चालकाने हा ट्रक तुषार नामक व्यक्तीचा आहे असे पोलिसांना सांगितले होते. याबाबत चौकीवर त्या दिवशी तैनात पोलीस नाईक अमोल डोम यांना संपर्क साधला असता त्यांनी सुरुवातीला काही माहिती नाही असे दाखवत नंतर तो दुसऱ्या कंपनीचा ट्रक असल्याचे सांगत अधिक बोलण्यासाठी नकार दिला.

पोलीस चौकीवर रासायनिक घनकचऱ्यांचा ट्रक पकडल्यानंतर त्याच दिवशी दुपारी पोलिसांनी हा ट्रक नियमबाह्य़पणे सोडून दिला. यातच महत्त्वाचे म्हणजे मालवाहू ट्रकमध्ये रासायनिक घनकचरा असताना देखील याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती पोलिसांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली नाही. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे. केमिकल माफियांना काही पोलिसांची साथ असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने ट्रक पकडला त्या दिवशीचे चित्रीकरण पाहून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत बोईसर पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत काही माहिती नसल्याचे उत्तर दिले.

भंगारमाफियांमध्ये महिला?

तारापूर औद्योगिक क्षेत्रांमध्ये काही नामांकित कंपन्याचा रासायनिक घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी ठेका काही रसायन व भंगार माफियांनी घेतला आहे. या मध्ये एका महिलेचे नाव पुढे येत  आहे. काही महिन्यांपूर्वी मनोर हद्दीत विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी या महिलेची रासायनिक घनकचऱ्याचे वाहन अडवल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली आहे.   याबाबत पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांना मोबाईलद्वारे संदेश व वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.