राहाता: शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर परिसरात अल्पवयीन मुलांकडून भिक्षा मागविणे, प्रसाद व फुले विक्रीसारखी कामे करवून घेणे, त्यांना शाळेत न पाठवणे अशा प्रकारे मुलांना क्रूर वागणूक मिळत असल्याचे उघड झाल्याने १२ पालकांविरुद्ध मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १२ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे.

हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र असून, या पालकांवर अटकेची कारवाईदेखील पोलिसांकडून करण्यात येणार आहे. पालकांवर कारवाई होण्याची ही राज्यातील अशा स्वरूपाची पहिलीच कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

शिर्डी हे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र असल्याने रोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर फोटो विक्री, मूर्ती विक्री, फुले-हार-प्रसाद विक्री व गंध लावणे यांसारखे व्यवसाय होतात. काही पालक आपल्या अल्पवयीन मुलांना या ठिकाणी कामाला लावून आर्थिक फायदा करून घेत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांना अनावश्यक शारीरिक व मानसिक कष्ट सहन करावे लागत आहेत. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या मुलांचे भविष्य धोक्यात येत असून, पालकांकडून होणारे दुर्लक्ष उघड झाले आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस, श्री साईबाबा संस्थान, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. या बाराही मुलांचे जबाब नोंदविण्यात आले.

बालकल्याण समितीने या बाराही मुलांची संगमनेर व श्रीरामपूर येथील आधार गृहामध्ये रवानगी केली. अल्पवयीन मुलांना क्रूर वागणूक दिल्याचे महिला व बालविकास विभागाच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याने या १२ पालकांविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मोहिमेत उपनिरीक्षक निवांत जाधव, अंमलदार संदीप उदावंत, केवलसिंह राजपूत, किरण माळी, गजानन गायकवाड, विजय धनेधर, सुनीता पवार, तसेच महिला व बालविकास विभागाचे परीविक्षा अधिकारी योगिराज जाधव, संरक्षण अधिकारी गिरिधर चौरे व इतर कर्मचारी सहभागी होते. मुलांना दुर्लक्षित आयुष्य जगण्यास भाग पाडून, त्यांचे शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या त्यांच्या पालकांविरुद्धही बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एकूण १२ मुलांच्या १२ पालकांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र असून, या पालकांच्या अटकेची कारवाई पोलीस करणार आहेत.

गेल्या काही महिन्यांत अल्पवयीन मुलांनी शिर्डीत विविध गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. भाविकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली. – सोमनाथ वाघचौरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक