सोलापूर शहरात वाढती गुन्हेगारी, बेसुमार अवैध धंदे, त्यावर पोसली गेलेली गुंडगिरी, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियेच्या विरोधात एका सामाजिक संघटनेने पालकमंत्री विजय देशमुख यांच्या गळ्यात ‘मटका चिठ्ठय़ां’ंचा हार घालून निषेध नोंदविण्याचा इशारा दिला खरा; परंतु पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा करण्याऐवजी पालकमंत्र्यांच्या गळ्यात मटका चिठ्ठय़ांचा हार घातला जाऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पालकमंत्र्यांना विशेष पोलीस संरक्षण दिले आहे. तथापि, पालकमंत्री देशमुख यांनीदेखील पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियेवर कोडे मारत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
शहरात पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढतच असून यात अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. त्याबाबतची स्पष्ट कबुली देताना पालकमंत्री देशमुख यांनी हतबलताही दर्शविली. उच्च मध्यमवर्गीय व उच्चभ्रूंच्या वसाहतीतही अवैध धंदे वाढल्याचे आपण स्वत: पोलीस आयुक्त रासकर यांच्या निदर्शनास आणून देत हे अवैध धंदे तातडीने बंद करण्याच्या सूचना वारंवार दिल्या होत्या. परंतु त्याकडे कानाडोळा करण्यात आल्याचे स्वत: देशमुख यांनी सांगितले. पोलीस आयुक्त रासकर यांच्या कार्यपध्दतीवर आपण अजिबात समाधानी नसून त्यांचा कार्यकाळही संपला आहे. तेव्हा येत्या चार-पाच दिवसांत त्यांची बदली करून कार्यक्षम पोलीस आयुक्त आणला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘मटका चिठ्ठय़ां’ंचा हार आपणास घातला जाऊ नये म्हणून विशेष पोलीस संरक्षण देण्यापेक्षा हीच पोलीस यंत्रणा अवैध धंदे बंद करण्यासाठी वापरायला हवी होती, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात संभाजी आरमार या सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून पालकमंत्री देशमुख यांनाच ‘मटका चिठ्ठय़ां’ंचा हार घालण्याचा इशारा दिला होता. त्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिध्द करताच पोलीस प्रशासनाने वेगळी खबरदारी म्हणून पालकमंत्र्यांसाठी पोलीस संरक्षण दिले आहे. यापूर्वी २००० साली वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावर एका संघटनेने तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या गळ्यात ‘मटका चिठ्ठय़ां’ंचा हार घालून निषेध नोंदविला होता. विशेष बाब म्हणजे विजय देशमुख हे मंत्री झाल्यापासून त्यांनी स्वत:साठी पोलीस संरक्षण नाकारत एकटेच फिरणे पसंत केले होते. दोन दिवसांपासून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2015 रोजी प्रकाशित
‘मटका चिठ्ठय़ां’चा हार घालण्याच्या भीतीने पालकमंत्र्यांना पोलीस संरक्षण
सोलापूर शहरात वाढती गुन्हेगारी, बेसुमार अवैध धंदे, त्यावर पोसली गेलेली गुंडगिरी, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियेच्या विरोधात एका सामाजिक संघटनेने पालकमंत्री विजय देशमुख यांच्या गळ्यात ‘मटका चिठ्ठय़ां’ंचा हार घालून निषेध नोंदविण्याचा इशारा दिला

First published on: 13-04-2015 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police security for guardian minister