|| रमेश पाटील
जिल्हा परिषदसाठी २३ तर पंचायत समितीसाठी ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ७ जानेवारी रोजी निवडणुका होता आहेत. त्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे, वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी पाच जागा व पंचायत समितीच्या १२ जागांपैकी पाच जागा या बिगरआदिवासींसाठी असल्याने सर्वच पक्षांनी बलाढय़ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे येथे अटीतटीची लढत होत आहे.
वाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बहुतांशी गट गणात पाच ते सात उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत ही शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडी या तिघांमध्येच रंगणार आहेत.
जिल्हा परिषदेसाठी असलेल्या सहा जागांपैकी पाच जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असल्याने या सर्व जागांवर अटीतटीच्या लढती होत आहेत. अबिटघर गटामध्ये पालघर जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या विद्यमान सभापती धनश्री चौधरी (भाजप), जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नरेश आकरे (राष्ट्रवादी ), शरद पाटील (शिवसेना) व डॉ. भाई वलटे (अपक्ष) यांच्यामध्ये चौरंगी लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे.नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पालसई गटामध्ये भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत आहे. या गटामध्ये एक अपक्षही उमेदवार आपले भवितव्य आजमावित आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला राखीव असलेल्या गारगांव व मांडा या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या तीन प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीची लढत होत आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या मोज गणामध्ये भाजप, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांतील उमेदवारांमध्ये लढत होत आहे. तालुक्यातील अनुसूचीत जमातीसाठी एकमेव राखीव असलेल्या कुडूस गटात शिवसेना, काँग्रेस, भाजप या तीन प्रमुख पक्षांत लढत होत आहे. तालुक्यातील पंचायत समितीच्या १२ जागांसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व मनसेमध्ये चौरंगी लढत होत आहे.
जिल्हा परिषद गट
- गारगांव – चार उमेदवार
- मोज – तीन उमेदवार
- मांडा – चार उमेदवार
- पालसई – चार उमेदवार
- अबिटघर – चार उमेदवार
- कुडुस – चार उमेदवार
पंचायत समिती गण
- गारगांव – सहा उमेदवार
- डाहे – आठ उमेदवार
- मोज – सात उमेदवार
- सापणे – दोन उमेदवार
- मांडा – चार उमेदवार
- गालतरे – सहा उमेदवार
- पालसई – सहा उमेदवार
- केळठण – चार उमेदवार
- अबिटघर – सात उमेदवार
- खुपरी – चार उमेदवार
- कुडूस – तीन उमेदवार
- चिंचघर – चार उमेदवार