वंशाला दिवाच मिळावा म्हणून मुलगी जन्मण्यापूर्वीच गर्भातच तिची हत्या घडवण्याच्या घटनांमध्ये राज्यात आघाडीवर असलेल्या बीड जिल्ह्यातच एक बंजारा समाजातील गरीब कुटुंब आपल्या साडेपाच वर्षांच्या मुलीला जगवण्यासाठी जिवाचे रान करीत आहे. तापाचे निमित्त होऊन अंथरुणाला खिळलेली दिव्या राठोड नावाची ही चिमुरडी गेल्या पाच महिन्यांपासून कृत्रिम श्वसनयंत्रणेवर जीवनाची दोरी घट्ट धरून आहे. दिव्याचे आई-वडीलही आपले घरदार आणि शेत गहाण ठेवून तिच्या या लढाईत धीरोदात्तपणे उभे आहेत. लातूरच्या विवेकानंद रुग्णालयातील निष्णात डॉक्टरांच्या देखरेखीखाली मृत्यूशी झुंज देत असलेल्या दिव्याला गरज आहे ती प्रार्थना आणि पाठबळाची.
 बीड जिल्हय़ातील जीवनापूर (तालुका माजलगाव) या गावात दत्तात्रय राठोड हे पत्नी पुष्पा, मुलगा व मुलीसह राहतात. तीन एकर शेतजमिनीवर या चौकोनी कुटुंबाचा गाडा कसाबसा सरकत असतानाच बालवाडीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलीला, दिव्याला गेल्या ऑक्टोबरमध्ये तापाचे निमित्त झाले. स्थानिक डॉक्टरांनी औषधे देऊनसुद्धा गुण येईना म्हणून परळीतील डॉक्टरांकडे नेले. तेथून लातूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने तेथील डॉक्टरांनी तिला सोलापूरला नेण्यास सांगितले. दिव्याच्या हाता-पायाला अर्धागवायूचा त्रास वाढला होता व श्वास घेणेही दुरापास्त झाले होते. त्यामुळे सोलापूर येथे महिनाभर कृत्रिम श्वासाच्या यंत्रणेवर ठेवले. मात्र, प्रकृतीत काहीच सुधारणा नसल्यामुळे पुन्हा लातूरलाच, विवेकानंद रुग्णालयात आणण्यात आले. गेल्या चार महिन्यांपासून ही चिमुरडी एक मिनिटदेखील कृत्रिम श्वसनयंत्रणेशिवाय श्वास घेऊ शकत नाही. देशातील उपलब्ध सर्व प्रतिजैविके देऊन पाहिली. श्वासनलिकेवर ‘ट्रक्टोस्टॉमी’ ही शस्त्रक्रिया करून शिट्टी बसवली. आतापर्यंत १४ वेळा ब्राँकोस्कोपी करून फुप्फुसात अडकलेला बेडका दुर्बीणीद्वारे काढावा लागला. तिच्या शरीरातील संपूर्ण रक्त तीन वेळा बदलले, पण दिव्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होताना दिसत नाही.  
पालकांचीही जिद्द
आतापर्यंत दिव्याच्या उपचारावर तब्बल ५ लाख रुपये खर्च झाला आहे. निम्मा भार विवेकानंद रुग्णालयाने उचलला. उरलेल्या रकमेसाठी राठोड यांनी तीन एकर शेतजमीन गहाण ठेवली. नातेवाईकांनी हातउसने पसे दिले, पण लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळेच आता या मातापित्यांनी समाजासमोर हात पसरला आहे. दिव्याच्या उपचारांसाठी आर्थिक हातभार लावू इच्छिणाऱ्यांनी लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी विनोद खरे (मो. ९४२२६११००६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राठोड कुटुंबाने केले आहे.