राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी, विशेषत: महाविकास आघाडीकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार. सध्या राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा चालू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं सांगितलेलं असताना सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी यासंदर्भात खोचक शब्दांत सूचक विधान केलं आहे.
काय आहे मंत्रीमंडळ विस्ताराचा तिढा?
सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचंच मंत्रीमंडळ होतं. त्यानंतर २० मंत्र्यांचा शपथविधी करण्यात आला. मात्र, तेव्हापासून पुढील मंत्रीमंडळ विस्तारासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांपैकी नेमकं कुणाला मंत्रीपदं द्यायची, यावर उत्तर सापडत नसल्यामुळेच मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडत असल्याचं बोललं जात आहे. तसेच, निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हाचाही मुद्दा प्रलंबित आहे. आमदारांच्या निलंबनाचा मुद्दाही अद्याप न्यायालयात निकालाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळेही मंत्रीमंडळ विस्तार लांबल्याचं सांगितलं जात आहे.
बच्चू कडूंना कोणतं मंत्रीपद?
सरकार अस्तित्वात आल्यापासून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी अनेकदा मंत्रीपदासंदर्भात जाहीररीत्या भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने अपंग मंत्रालय स्वतंत्रपणे सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, अद्याप त्या मंत्रालयाचा कारभार कुणालाही सोपवण्यात आलेला नाही. बच्चू कडूंनी अनेकदा या मंत्रालयाची जबाबदारी आपल्याला मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, अद्याप त्यांच्या मंत्रीपदाचीही घोषणा जाहीर न झाल्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.
पहाटेच्या शपथविधीचं रहस्य काय? प्रश्न विचारताच शरद पवारांनी एका ओळीत संपवला विषय, म्हणाले…
दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “सगळ्या राहिलेल्या आमदारांना रात्री चांगली झोप लागते. त्यांना अशीच शांततेनं झोप लागली पाहिजे, म्हणून मंत्रीमंडळ विस्तार लांबवतायत. कारण आता २० आमदारांनाच मंत्रीपद मिळेल. त्यामुळे बाकीचे आमदार नाराज होणार. ते बिचारे मग चांगली झोप घेणार नाहीत. त्यांनाही चांगली झोप घेता यायला पाहिजे, म्हणून मंत्रीमंडळ विस्तार लांबवतायत”, असं बच्चू कडू म्हणाले.