scorecardresearch

प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोलापूरचे आव्हान अधिक महत्त्वाचे

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत.

Praniti Shinde among Congress star campaigners for Uttar Pradesh elections

|| एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत प्रणिती शिंदे यांचा समावेश झाल्याने त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळाली असली तरी सोलापूरमध्येही पक्षाला उभारी देण्याचे आव्हान त्यांना स्वीकारावे लागणार आहे. सोलापूररूपी स्वत:चे घर नीटनेटके सांभाळले तरच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर वाटचाल करण्याला अर्थ राहणार आहे.

चार दशकांपेक्षा अधिक काळ राज्य आणि देशाच्या सत्ताकारणात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेले आणि अलीकडे मोदी लाटेत पीछेहाट झालेले ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे आता राजकारणात फारसे सक्रिय दिसत नाहीत. त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून काम करताना स्वत:चा ठसा उमटवत पुढे वाटचाल करीत आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. त्यामुळे त्यांचा राज्यात संपर्क वाढला आहे. यातच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्येही आमदार प्रणिती शिंदे यांना स्थान देण्यात आले आहे.

सुशीलकुमार शिंदे यांचे राजकारण सत्ताकारण लहानपणापासून पाहताना त्याकडे प्रणिती शिंदे आकृष्ट झाल्या आणि त्यांनी त्या दिशेने पाऊल टाकले. सुरुवातीला राजकारणात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी जाई-जुई विचार मंचच्या माध्यमातून समाजकारणाला वाहून घेतले. विशेषत: युवक आणि महिलांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी कार्य हाती घेतले. सोलापूरच्या बहुभाषक, बहुसांस्कृतिक, अठरापगड जाती-जमातींच्या वर्गांशी त्यांची नाळ जुळली. विडी, यंत्रमागासारख्या उद्योगातील बहुसंख्य गरीब कष्टक-यांच्या झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे उठावदार कार्य झाले. मोची समाजातील महिला काच, कचरा, प्लास्टिक वेचण्याचे काम करीत. त्यांच्या मुलीही हेच काम करू लागल्या. तेव्हा प्रणिती शिंदे यांनी अशा मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. एवढेच नव्हे तर वडील सुशीलकुमार शिंदे यांच्या सत्ताकारणाचा उपयोग करून अशा काही वंचित, उपेक्षित मुलींना व्यावसायिक शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी थेट दिल्लीत पाठविले. रोजगाराभिमुख विडी उद्योग अडचणीत आला असताना काळाची पावले ओळखून तरुण महिला कामगारांना या उद्योगातून बाहेर काढत गार्मेंट क्षेत्रात आणले आणि प्रशिक्षित केले. अशा प्रकारच्या समाजकारणातून प्रणिती शिंदे यांची स्वत:ची छबी निर्माण झाली. सोबत वडिलांची पुण्याई तर होतीच. याच बळावर त्यांनी राजकारणात दमदार पाऊल टाकत वेगळा ठसा निर्माण केला आहे. अलीकडे २०१४ आणि २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकीकडे मोदी लाट आणि दुसरीकडे एमआयएमचा मोठा अडसर असताना त्यांनी दोन्ही वेळा आव्हाने यशस्वीपणे पेलत विरोधकांना आस्मान दाखविले. घरभेदींचाही बंदोबस्त केला.

सुशीलकुमार शिंदे हे राजकीय निवृत्तीकडे झुकत असताना प्रणिती शिंदे यांना संपूर्ण स्थानिक राजकारण सांभाळण्याचे आव्हान ठरले आहे. विशेषत: भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी त्यांची कसोटी लागली आहे. मागील २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसची वर्षानुवर्षे सत्ता गेली आणि भाजपने महापालिका ताब्यात घेतली. १०२ नगरसेवकांच्या पालिका सभागृहात काँग्रेसचे अवघे १४ नगरसेवक निवडून आले आले. पक्षाची घटलेली ही ताकद पुन्हा पूर्वीसारखी भक्कम करण्याचे आव्हान आमदार प्रणिती शिंदे यांच्या समोर आहे. तोंडावर आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागणार आहे. त्यासाठी पक्षातील जुन्या-नव्या सहका-यांशी योग्य समन्वय साधून कौशल्याने नेतृत्वाची जबाबदारी तेवढ्याच जिद्दीने पार पाडावी लागणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Praniti shinde included congress list star campaigners uttar pradesh elections akp

ताज्या बातम्या