जागतिक सायकल स्पर्धेसाठी वाईच्या प्रसाद एरंडे याची निवड झाली आहे. या स्पध्रेसाठी किसन वीर कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायकल देऊन त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे व कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले उपस्थित होते.
दिनांक १ मार्च रोजी लंडन येथून ही स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पध्रेत स्पर्धकाला जवळ जवळ २८ हजार किलोमीटर सायकलींग करायचे आहे. जगातील सहा खेळाडूंसोबत निवड झालेला प्रसाद हा एकमेव व पहिला भारतीय स्पर्धक आहे. जागतिक सायकल स्पर्धा म्हणजे सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा आहे. ही सायकल स्पर्धा लंडनपासून सुरू होत आहे. त्याचा मार्ग फ्रान्स, इटली, स्लोवेनिया, टर्की, त्यानंतर भारतात मुंबई ते कोलकाता, पुढे बँकाक ते सिंगापूर, पर्थ ते सिडणी, सॅनफॅन्सिसको ते मेक्सिको, पेरू ते अर्जेटिना, पोर्तुगाल, स्पेन आणि परत लंडन अशी ही स्पर्धा आहे. या स्पध्रेत २८ हजार किमी प्रवास सायकलने आणि १२ हजार किमी  विमान किंवा समुद्रमाग्रे होणार आहे. हा संपूर्ण प्रवास ९१ दिवसांत तो पूर्ण करणार आहे. या स्पध्रेत विजयी होणाऱ्याचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये नोंदविले जाणार आहे. या स्पध्रेत प्रसाद बरोबर ब्रिफनी अर्ली आर्यलड), नॅथन अक्हनबेरी (अमेरिका), जेसनसॅन्डर्स(इंग्लड), मॅक्समीसिटर(फ्रान्स) आणि फ्रॅन हॉलिन्डर (जर्मनी) हे अन्य सायकलपटू सहभागी होणार आहे.
प्रसादने सुरुवातीला उंची वाढविण्यासाठी सायकलिंग सुरू केले. त्यानंतर तो सायकलच्या प्रेमातच पडला. आतापर्यंत त्याने महाराष्ट्र व भारतात अनेक ठिकाणी सायकल प्रवास केला आहे. ताशी २० किमीच्या गतीने सध्या तो दररोज २०० किमी सायकलिंगचा सराव करतो. हा सर्व प्रवास तो साध्या सायकलने करत आहे. ‘कार्बन फायबर’ची सायकल असेल तर तो दररोज तीनशे साठ किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापू शकेल. ही सायकल घेण्यासाठीचे त्याचे प्रयत्न सुरू असताना किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसलेंना ही माहिती मिळाली. त्यांनी कारखान्याच्या वतीने एक लाख रुपये किमतीची ‘कार्बन फायबर सायकल’ त्याला देण्याचा निर्णय घेतला. या सायकलचे वजन फक्त पाच किलो आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किसन वीर कारखान्यावर यशवंतराव चव्हाण सहवीज निर्मिती केंद्रांच्या उद्घाटनासाठी आले असताना त्यांच्या हस्ते व मदन भोसलेंच्या उपस्थितीत ही सायकल प्रसादला देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीही या स्पध्रेविषयी प्रसादकडून माहिती घेतली.