Pooja Chavan Case : प्रवीण दरेकरांचे सरकारला १४ सवाल! म्हणाले, ‘जनतेलाही हवीत उत्तरं’!

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारला १४ प्रश्न केले आहेत.

Pravin Darekar questions cm uddhav thackeray
संग्रहीत छायाचित्र

राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाशी जोडलं गेलेलं असतानाच विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. संजय राठोड यांनी मंगळवारी पोहरादेवी येथे दर्शन घेऊन ‘चौकशी झाल्यावर सारंकाही उजेडात येईलच’, असं म्हणत आपण निर्दोष असल्याचच अप्रत्यक्षपणे सुचवलं आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांना या प्रकरणावरून १४ प्रश्न विचारले आहेत. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर त्यांनी या १४ प्रश्नांचं पत्र ट्वीट केलं आहे. ‘विधानपरिषद विरोधी पक्षनेता म्हणून पूजा चव्हाण यांच्या आत्म’हत्या’ प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांना माझे काही प्रश्न आहेत. मविआ सरकारकडून जनतेसह सर्वांनाच या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत’, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हे आहेत प्रवीण दरेकरांचे १४ प्रश्न:

Pravin Darekar Letter to CM on Pooja Chavan Suicide Case
सौजन्य : प्रवीण दरेकर यांचे ट्वीटर हँडल

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात मुक्यमंत्र्यांनी तपासाचे निर्देश दिले आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकार संजय राठोड यांना पाठिशी घालत असल्यची टीका सुरू केली आहे. तर सरकारकडून देखील दोषींवर कारवाई केली जाईल, असं सांगितलं जात आहे. त्यातच संजय राठोड यांच्या पोहरादेवी भेटीदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्यामुळे करोना काळातल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना ‘कायदा आणि नियमांचं पालन करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. मग कुणी आपलंही का असेना. मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही चूक झाली असेल, तर कायदा आपलं काम करेल’, असं म्हटलं आहे. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणासोबतच आता पोहरादेवी येथे झालेली गर्दी हा देखील आता चर्चेचा विषय ठरला आहे.

 

दरम्यान, आता प्रवीण दरेकरांच्या या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांकडून कसं उत्तर दिलं जाईल, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pravin darekar questions cm cp mumbai on pooja chavan suicide case pmw