राज्यामधील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपामध्ये पुन्हा एकदा नव्या वादाची ठिणगी पडली आहे. यावेळेस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ठाकरे सरकारने विमान प्रवासाची परवानगी नाकारल्याची माहिती समोर आल्याने भाजपाने आक्रामक पवित्रा घेतला आहे.  राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना विमान प्रवासाला मनाई करण्याचा प्रकार म्हणजे राज्य सरकारच्या सूड भावनेने वागण्याच्या वर्तणुकीचा परमोच्च बिंदू आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी कोल्हापुरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

राज्यपालांना विमानातून उतरवण्याचा प्रकार माहीत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात दरेकर यांना विचारले असता त्यांनी या मुद्द्यावरुनही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीला इतकी महत्त्वाची घटना माहीत असे म्हणणे अर्धसत्य आहे. मुळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस या तिघांमध्ये वेगवेगळे निर्णय होत असतात. त्यांची एकमेकाला माहिती नसते,’ असा टोला दरेकरांनी लगावला आहे.

आणखी वाचा- राज्यपालांना ठाकरे सरकारने विमानातून उतरवलं?; जाणून घ्या नेमकं काय झालं?

ट्विटरवरुनही दरेकर यांनी, “राज्यपालांच्या विमान प्रवासाला परवानगी नाकारून ठाकरे सरकारने प्रथा-परंपरांना हरताळ फासला आहे.हा सूड भावनेचा अतिरेक असून एवढ्या सूड भावनेने वागणारं सरकार आजपर्यंत पाहिलं नाही.राजकारण व सूड भावना समजू शकतो. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे,पदाची गरिमा राखली पाहिजे. मात्र सूडभावना किती नसानसात भरली आहे, हे ठाकरे सरकारने दाखवून दिलं,” अशी टीका केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देहरादूनला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले असता त्यांना घेऊन जाणाऱ्या विमानाला राज्य सरकारने उड्डाणाची परवानगी दिली नसल्याचं सांगण्यात आलं. राज्य सरकारच्या विमानाने ते देहरादूनला जाणार होते. त्यानंतर कोश्यारी खासगी विमानाने देहरादूनला रवाना झाले.

आणखी वाचा- राज्यपालांना विमानातून उतरवल्याने फडणवीस ठाकरे सरकारवर संतापले, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही घडलेल्या प्रकरावरुन नाराजी व्यक्त केलीय. “हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून महाराष्ट्रात याआधी असं कधीच घडलेलं नाही. राज्यपाल ही व्यक्ती नसून पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. राज्यपाल हेच राज्याचे प्रमुख असतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ नेमतात असं आपल्या संविधानानं सांगितलं आहे. राज्यपालांना राज्य सरकारचं विमान वापरायचं असेल तर जीएडीला एक पत्र पाठवावं लागतं आणि नंतर परवानगी मिळते अशी पद्धत आहे. मला माहिती मिळाल्याप्रमाणे अशाप्रकारे पूर्ण कार्यक्रम जीएडीला गेला. मुख्य सचिवांना याची माहिती होती, फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली, पण जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं हा पोरखेळ आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली आहे.