मराठा समाजाच्या समस्या आरक्षणाने सुटू शकत नाहीत. जर खुल्या वर्गातील लोक आरक्षणातआले तर आरक्षणाचं औचित्यच संपून जाईल, असं परखड मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि मराठा नेते प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात प्रादेशिक अस्मितांपेक्षा जातीय अस्मिता तीव्र झाल्या आहेत असंही प्रवीण गायकवाड म्हणाले, काही वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केलं.

आमच्यासाठी महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे

आमच्यासाठी महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे. एसटी, एससी, ओबीसी, ओपन यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे. तसेच सध्याच्या नेत्यांनी भाषेची मर्यादा पाळली पाहिजे. नेत्यांच्या भाषेमुळे समाजात द्वेष पसरत चालला आहे. नेत्यांनी जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवता कामा नये. पण अलीकडे नेत्यांच्या भाषेमुळे समाजात द्वेष पसरत चालला आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी राज्यभरात कार्यक्रम घेणार आहोत. जेणेकरुन अस्वस्थ परिस्थिती आणि टोकदार भूमिका संपवता येतील. लोकशाहीत सर्वांना मागण्याचा हक्क आहे. सरकारने चुकीचे धोरण घेतले तर न्यायालयात दाद मागता येऊ शकते. नेत्यांनी समाजात अस्वस्थता आणि जातीय, धार्मिक, वर्गीय द्वेष पसरवू नये. महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे, असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं.

शिक्षण महागल्यामुळे बेरोजगारीच्या समस्येमुळे प्रश्न उद्भवले आहेत-प्रवीण गायकवाड

शिक्षण महागल्यामुळे आणि बेरोजगारीच्या समस्येमुळे काही प्रश्न उद्भवले आहेत. या समस्येवर फक्त आरक्षण हे उत्तर आहे, असे मला वाटत नाही, असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले. मराठा आणि ओबीसी समाज आरक्षण का मागत आहेत तर त्यांना माफक दरात शिक्षण मिळावं आणि सरकारी नोकरी मिळावी. पण आता सरकार नोकरभरती करत नाही. खासगी कंपन्यांमध्येही फारशा नोकऱ्या उरलेल्या नाहीत. ही समस्या वेगळी आहे. पण अनेकांना त्यावर आरक्षण हा शाश्वत मार्ग आहे, असे वाटते, असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे. शिक्षणाचे बजेट वाढवणे हे गरजेचं आहे. आरक्षणाने सर्व परिस्थिती ठीक होईल, असे नाही. सरकारने सांगितलं पाहिजे, परिस्थिती काय आहे? कोर्टात जीआर टिकतो का, हे पहावं लागेल. सरकार एकीकडे मराठा समाजाला ओबीसी स्टेटस देते, मात्र मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश देत नाही. सरकारने दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे. सरकारने सत्य बोलावे, असेही प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे.