गेले महिनाभर सुरू असलेली अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (भिंगार) निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी सायंकाळी थंडावली. जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्ष व उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सात जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे. या सात जागांसाठी तब्बल ५४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सात वर्षांनंतर बोर्डाची पंचवार्षिक निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून, मतदारांमध्येही उत्साह असल्याने चुरशीची चिन्हे आहेत. मागच्या सदस्यांना दोन वर्षे मुदतवाढ मिळाली होती. या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता सांगता झाली. ती लक्षात घेऊनच गेल्या तीनचार दिवसांपासून प्रचाराची रंगत वाढली होती. या तीनचार दिवसांत सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी त्यात सहभाग घेतला. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारेच मतदान होणार असले तरी यात ‘नोटा’ (नन ऑफ दी अबव्ह- यापैकी कोणीही नाही) अशा नकाराधिकाराच्या मतदानाची व्यवस्था नाही.
भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष या निवडणुकीत चिन्हावर उतरले आहेत. दोन्ही काँग्रेस स्वबळावर सर्व जागा लढवत आहे. शिवसेनेशी युती केल्यानंतर भाजपच्या वाटय़ाला तीन व शिवसेनेच्या वाटय़ाला चार जागा गेल्या आहेत. मात्र भाजपच्या दोघा इच्छुकांनी तरी दोन प्रभागांमध्ये बंडखोरी केली असून, येथे त्यांच्यामध्ये मैत्रिपूर्ण लढती होत आहेत. मनसेने पाच जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
मागच्या पंचवार्षिकमध्ये शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांचे समान म्हणजे तीन सदस्य होते, मात्र भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या एका सदस्याच्या पाठिंब्यावर काँग्रेसकडेच ही सत्ता होती. ती टिकवण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी कंबर कसली असून भाजप-शिवसेना युतीही त्यासाठी प्रयत्नशील आहे. भाजपचे नगरचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, खासदार दिलीप गांधी यांच्यासह शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी मागच्या काही दिवसांत येथे प्रचार फेऱ्या, सभांची राळ उडवून दिली. राष्ट्रवादीकडून नगरचे महापौर तथा आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप या निवडणुकीसाठी सक्रिय आहेत.
 
एकूण प्रभाग- ७
उमेदवार- ५४
एकूण मतदान- १६ हजार ७१४
मतदान केंद्रे- २१
मतदान- रविवार, दि. ११- सकाळी ७ ते सायंकाळी ६
मतमोजणी- सोमवार, दि. १२