अकोला : आमदार नितीन देशमुख यांच्यावर काहीतरी दबाव आणला जात असेल, म्हणूनच ते परत येऊ शकत नाही आहेत, असा संशय त्यांच्या पत्नी प्रांजली यांनी व्यक्त करून आपण त्यांच्या भेटीसाठी सुरत येथे जात असल्याचे सांगितले. पतीला भेटण्यासाठी पत्नीला कोणीही रोखू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.
शिवसेनेचे नाराज नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना आमदारांच्या एका गटासह सुरत गाठले. त्यांच्यासोबत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख असल्याचे सांगितले जात आहे. आ. देशमुखांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सुरत येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, पत्नी प्रांजली यांनी आपले पती बेपत्ता असल्याची तक्रार अकोला पोलिसांत दाखल केली. ते सुरत येथे असल्याचे कळते, यामुळे मी त्यांच्या भेटीसाठी सुरतला जाणार आहे, असे प्रांजली देशमुख यांनी सांगितले. सध्या माझ्या मनाची मोठ्या प्रमाणात घालमेल सुरू आहे. माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत. आमदार देशमुख असलेल्या हॉटेलमध्ये कोणालाही सोडत नसले तरी मी त्यांची पत्नी आहे. मला माझ्या पतीला भेटू आणि बोलू द्यावेच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.