राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावर चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी या चर्चेला उत्तर दिले. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गाधींसह काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्यावर खालच्या स्तरावर टीका करणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या भाषणावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींचं संसदेतील भाषण हे महापालिकेच्या स्थरावरचं होतं, असं ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “थोरातांच्या आरोपांत तथ्य असू शकते”, ठाकरे गटाच्या काँग्रेसला कानपिचक्या; सत्यजीत तांबेंचाही केला उल्लेख!
काय म्हणाले पृथ्वीराच चव्हाण?
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा ही वर्षातील सर्वात गंभीर आणि महत्त्वाची चर्चा असते. सरकारचा कार्यक्रम राष्ट्रपती मांडतात आणि त्यावर ही चर्चा होते. यावर विरोधी पक्षासह सत्ताधारी नेते बोलतात आणि शेवटी या सर्व चर्चेला पंतप्रधान उत्तर देतात. ते उत्तर काल मोदींनी दिलं. पण या चर्चेत राहुल गांधींसह इतर विरोधी पक्षांकडून अतिशय महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याला मोदींनी बगल दिली. काही तरी टिंगल करत अगदी महापालिकेच्या स्तरावरचं भाषण केलं. ही आमची अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
अदाणी प्रकरणामुळे भांडवली बाजार कोसळला आहे. तसेच एलआयसी आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे शेअर्सही खाली आले आहेत. हे प्रकरण शांत करण्यासाठी पंतप्रधान मोदी या विषयावर बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मोदींनी सर्वच विषयला बगल दिली. यावरून हे सर्व आरोप खरे आहेत, हे गृहीत धरावं लागेल. पंतप्रधानांनी बालिश उत्तरं न देता, केवळ वेळ काढून नेली, असेही ते म्हणाले.