कापूस वेचणीच्या यंत्राबाबत शेतकऱ्यांकडून मोठी मागणी होत आहे, परंतु हे यांत्रिकीकरण शेतकऱ्यांना आíथकदृष्टय़ा किफायतशीर पाहिजे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व मोन्सॅन्टो इंडिया लिमिटेड यांच्यात सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्पांतर्गत १२ ऑगस्ट रोजी यंत्राद्वारे कापूस लागवड प्रात्यक्षिकाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
कुलगुरू म्हणाले, की कापूस वेचणीसाठी शेतकरी बांधवांना मोठय़ा प्रमाणात मजुरांची समस्या भेडसावत असून वेचणीसाठी मोठा खर्च होत आहे. यंत्राद्वारे कापूस वेचणीत येणाऱ्या अडचणींचे निराकरण या प्रात्यक्षिकात व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संशोधन संचालक डॉ. वासकर म्हणाले, की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कापूस लागवडीचे यांत्रिकीकरण प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर आधारित राबविणारे एकमेव विद्यापीठ असून मोठय़ा संख्येने शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकाची पाहणी करून ऐच्छिकरीत्या पुढे येऊन याबाबत प्रतिक्रिया द्यावी म्हणजे या तंत्रज्ञानात अनुकूल बदल करता येतील.  
प्रात्यक्षिकाबाबत सविस्तर माहिती डॉ. एस. एस. काजी व न्यू हॉलंडचे अधिकारी अमित परदानिया यांनी दिली. डॉ. काजी यांनी सांगितले, की या प्रकल्पात यंत्राद्वारे वेचणीसाठी अनुकूल वाणाची लागवड सधन पद्धतीने करण्यात येऊन याची शेतकऱ्यांच्या पारंपरिक कापूस लागवड पद्धतीशी पडताळणी करण्यात येणार आहे.