चिपळूण येथील साहित्य संमेलनाची ग्रंथिदडी ज्येष्ठ साहित्यिक हमीद दलवाई यांच्या मिरजोळी येथील निवासस्थानापासून काढण्याचा निर्णय रद्द करणे हा पुरोगामी विचारांचा अपमान आहे, अशा शब्दांत पुरोगामी विचारवंतांनी निषेध व्यक्त केला आहे.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष सय्यदभाई, सरचिटणीस प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांच्यासह डॉ. बाबा आढाव, भाई वैद्य, ताहेरभाई पूनावाला, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. सुहास पळशीकर, डॉ. यशवंत सुमंत, विद्या बाळ, रजिया पटेल, प्रा. सुभाष वारे, डॉ. अभिजित वैद्य, हुसेन जमादार, रामनाथ चव्हाण, प्रा. विलास वाघ, डॉ. संजय दाभाडे, डॉ. शरद जावडेकर, सुरेश देशमुख, राजन खान आणि नितीन पवार यांनी एका पत्रकाद्वारे या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
हमीद दलवाई यांचे साहित्य आणि सामाजिक कार्य महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी परंपरेतील आहे. एखाद्या अल्पसंख्य समाजातील नेत्याने आक्षेप घेतल्यामुळे ही िदडी रद्द करणे चुकीचे आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यां प्रा. पुष्पा भावे यांना चिपळूणमध्ये येऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतल्यामुळे त्या प्रमुख पाहुण्या असलेल्या पोलिसांचाच कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला आहे. हमीद दलवाई आणि पुष्पा भावे यांचे विचार काहींना अमान्य असले तरी त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य केले पाहिजे. कार्यक्रमपत्रिकेवर परशुरामाचे छायाचित्र आणि संमेलनस्थळी त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय म्हणजे पुरोगामी विचारांची खिल्ली उडवून जातीयवादाचा पुरस्कार करण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील जनतेने आणि सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन या विचारवंतांनी केले आहे.