राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधात गेली पाच-सहा वर्षे सुरू असलेल्या आंदोलनाची केंद्र व राज्य शासन दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी आता प्रकल्पालाच गराडा घालण्याचा आणि जेलभरो आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. येत्या २ जानेवारीला महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती व जनहित सेवा समितीच्या माध्यमातून शेतकरी, मच्छीमार या आंदोलनात सहभागी होतील आणि प्रकल्पाला शांतता मार्गाने वेढा घालतील, असे मच्छीमार नेते अमजद बोरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सुमारे १० हजार मेगाव्ॉट विजेची निर्मिती करणारा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प माडबन, मिठगवाणे, करेल, निवेली, चव्हाणवाडी या परिसरात उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प तार्यान्वित झाल्यानंतर त्यामधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे मानवी जीवनासहित प्रकल्प परिसरातील शेती, बागायती मच्छीमारी आणि एकूणच निसर्गाचे पर्यावरण बिघडण्याचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. तशातच हा प्रकल्प भूकंपप्रवण उभारण्यात येत असल्याने व त्याबाबत केंद्र व राज्य सरकारने कसलाही विचार न करता पोलीस बळावर प्रकल्पाचे काम रेटून नेण्याचा मार्ग अवलंबिल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. परिणामी पोलीस, जिल्हा प्रशासन आणि प्रकल्प विरोधकांमध्ये धुमश्चक्री उडून तबरेज सायेकर याचा पोलीस गोळीबारात हकनाक बळी गेला होता. मात्र त्यानंतरही प्रकल्प विरोधातील आंदोलकांचा धीर खचलेला नाही, असे बोरकर यांनी सांगितले.
सरकारच्या या जनहितविरोधी भूमिकेमुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी आता पुन्हा नव्याने आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २ जानेवारी २०१३ रोजी प्रकल्पस्थळालाच वेढा घालण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तामिळनाडूतील कुडनकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्पविरोधातील आंदोलनाप्रमाणेच येथेही आंदोलन छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन लोकशाही व शांततापूर्ण मार्गाने पार पाडण्यात येणार असून, कायदा व सुव्यवस्थेला कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल, असे आश्वासन बोरकर यांनी सांगतानाच प्रसंगी जेलभरो आंदोलनाची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.