पूजा मुळे ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित विभागीय पातळीवरील सुगम गीत गायन स्पर्धेत प्रथम आली. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त येथील गंगापूररोड वरील प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित या स्पर्धेत अमृता खोडके द्वितीय तर अनिकेत जाधवने तृतीय क्रमांक मिळविला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध गायक मकरंद हिंगणे यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांसाठी सर्व कलावंतांनी एकजुटीने विधायक लढा देण्याची गरज व्यक्त केली. समाजातील अपप्रवृत्तींवर कलेच्या माध्यमातून उत्तर द्यावे व कला संस्कृतीची जोपासना करावी. आज विविध क्षेत्रांबरोबरच कला क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. त्यात स्पर्धकांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी, यश संपादन करावे व आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
या वेळी स्पर्धकांनी ‘सांज ये गोकुळी, ‘मी राधिका, मी प्रेमिका’, ‘मर्म बंधातली ठेव ही’, ‘दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे’ अशा एकाहून एक सरस गीतांनी स्पर्धेची रंगत वाढवली. परीक्षक म्हणून भास भामरे, आसावरी खांडेकर यांनी काम पाहिले.