मेडिकल कॅम्पमध्ये उपचाराच्या नावाखाली २६ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका आयुर्वेदीक डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. रविवारी दुपारी पुण्यातील कोरेगाव पार्कमधील एका मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये ही घटना घडली. गुरुगोकुळ भास्करन गुरुस्वामी असे आरोपी डॉक्टरचे नाव असून मेडिकल कॅम्पमध्ये त्यांने अयोग्य पद्धतीने महिलेला स्पर्श केला.

पीडित महिला गर्भाशयासंबंधीच्या एका विकाराने त्रस्त आहे. या आजारातून आराम मिळावा म्हणून ती आयुर्वेदीक उपचार करुन घेण्यासाठी या शिबीरामध्ये आली होती. सोशल मीडियावरुन तिला या शिबीराबद्दल माहिती मिळाली होती. या प्रकरणी मुंडवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार पीडित महिला आठ एप्रिलला शिबीरामध्ये आली. दोन तास वाट पाहिल्यानंतर तिला उपचारासाठी बोलावण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी डॉक्टर गुरुगोकुळ भास्करने शिबीरामध्ये जवळपास ७० महिलांना तपासले. प्रत्येक रुग्णाकडून शुल्कापोटी त्याने ७ हजार रुपये वसूल केले. गुरुस्वामीने उपचाराच्या नावाखाली आपल्या खासगी अवयवांना स्पर्श केला असा आरोप पीडित महिलेने एफआयआरमध्ये केला आहे.

पोलिसांनी ताब्यात घेण्याआधीच मुख्य आरोपी आणि त्याचे दोन सहकारी घटनास्थळावरुन पसार झाले होते. पण त्यांनी राज्याबाहेर जाण्याआधीच पोलिसांनी गुरुस्वामीला अटक केली. गुरुस्वामीला कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मागच्यावर्षी सुद्धा गुरुस्वामीने अशाच प्रकारचा मेडिकल कॅम्प आयोजित केला होता. गुरुस्वामी आणखी अशा प्रकरणात सहभागी आहे का ? त्याचा पोलीस शोध घेत आहेत.