इतर शहरांच्या तुलनेत कमी खर्चात मिळणारे दर्जेदार उपचार, चांगले हवामान, शांत वातावरण, परदेशी विद्यार्थ्यांची मोठी संख्या या गोष्टींमुळे परदेशी रुग्ण वैद्यकीय पर्यटनासाठी पुण्याला पसंती देत आहेत. पुण्यात दरवर्षी उपचार घेणाऱ्या परदेशी रुग्णांची संख्या अडीच ते तीन हजार असून, त्यात वर्षांला १५ ते २० टक्क्य़ांची वाढ होत आहे. या क्षेत्राची सध्याची वार्षिक उलाढाल २५ ते ३० कोटी रुपयांच्या घरात गेली आहे.
जागतिक स्तरावर वैद्यकीय उपचारांना येणाऱ्या खर्चाच्या केवळ एक दशांश खर्चात भारतात हे उपचार होतात. यातही देशातील मेट्रो शहरांपेक्षा पुण्यातील वैद्यकीय उपचार स्वस्त असल्यामुळे परदेशी रुग्ण पुण्याकडे वळत आहेत. त्यामुळे पुण्याने या क्षेत्राच्या वाढीमध्ये आघाडी घेतली आहे.
परदेशी विद्यार्थ्यांच्या ओळखीने पुण्यात वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या परदेशी रुग्णांची संख्या वाढत असल्याचे मत ‘रुबी हॉल क्लिनिक’ चे वरिष्ठ अधिकारी सचिन दंडवते यांनी व्यक्त केले.
‘‘पुण्यात उपचारासाठी येणाऱ्या परदेशी रुग्णांचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये १५ ते २० टक्क्य़ांनी वाढत आहे. वर्षांला सुमारे अडीच ते तीन हजार रुग्ण येथे येतात. रुबी हॉल क्लिनिकमध्येच महिन्याला सुमारे ७० ते ८० परदेशी रुग्ण उपचारांसाठी येतात. यात कर्करोग, मणक्यांचे विकार आणि हृदयरोगावरील उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आता मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण नव्याने वाढत आहे. हे रुग्ण प्रामुख्याने नायजेरिया, टांझानिया, केनिया, इराक, इराण, ओमान या देशांतून येतात. अपत्यप्राप्तीसाठीच्या इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) उपचारांसाठी येणाऱ्यांचे प्रमाण नव्याने वाढू लागले आहे,’’ असे ते म्हणाले.

उपचारांच्या उपलब्धतेमुळे.. : ‘ऑयस्टर अँड पर्ल’ रुग्णालयाच्या संचालक डॉ. अमिता फडणीस म्हणाल्या, ‘‘ओमानसारख्या देशांमध्ये आयव्हीएफसारखे उपचार उपलब्ध असतातच असे नाही. त्यामुळे हे रुग्ण आयव्हीएफसाठी इथे येतात. गेल्या ८ महिन्यांत ‘सरोगसी’ साठीही ४-५ परदेशी जोडपी आली आहेत. आमच्याकडे महिन्याला सुमारे तीस परदेशी रुग्ण येतात. यात ओमान, नायजेरिया, इराक आणि सुदानमधील रुग्ण अधिक असतात. प्रामुख्याने मणके व सांध्यांच्या शस्त्रक्रिया, लायपोसक्शन, कॉस्मेटिक सर्जरी यासाठी हे रुग्ण येतात.’’