मुरुडजवळील काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला आहे. मयूर भिलारे असे या पर्यटकाचे नाव आहे. आज, रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
पिंपरी-चिंचवड येथील जेडी कंपनीतील ४३ जणांचा ग्रुप पर्यटनासाठी मुरुड येथील काशीद येथे आले होते. शनिवारी या सर्वांनी सर्वे येथे वस्ती करून रविवारी यातील १६ जण चिकणी समुद्रकिनारी पोहायला गेले होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास भरतीची वेळ असल्याने अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यातील तिघे जण पाण्यात ओढले गेले. किनाऱ्यापासून दूरवर गेल्याने त्यांनी बचावासाठी आरडाओरडा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक जीवरक्षकांनी धाव घेतली. स्पीड बोटीच्या मदतीने सचिन चंडालिया (वय २५) आणि नीलेश बर्गे (वय २८) यांना वाचवण्यात यश आले. परंतु, प्रयत्न करूनही मयूर भिलारेला वाचवू शकले नाहीत. अखेर तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने त्याचा उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र, त्याचा मृतदेह सापडू शकला नाही.