पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून परदेशात पळालेल्या नीरव मोदीवरुन संजय राऊत यांनी भाजपला चिमटा काढला आहे. ‘पैसे बँकेत ठेवले तर नीरव मोदीची भीती आणि घरी ठेवले तर नरेंद्र मोदींची भीती’ असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला असून ईडीनेही चौकशी सुरु केली आहे. नीरव मोदीच्या घर, कार्यालये तसेच देशभरातील शोरुम्सवर छापे घालण्यात आले आहेत. पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटी रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणातील नीरव मोदी हा मुख्य सूत्रधार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यावर प्रतिक्रिया दिली. ‘बँकेत पैसे ठेवले नीरव मोदीची भीती आणि घरात ठेवले तर नरेंद्र मोदींची भीती’ असे ट्विट त्यांनी केले. नीरव मोदी हा व्हायरस झपाट्याने पसरत आहे, असेही त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
Nirav Modi Virus Spreading Rapidly.
जय हिंद— Sanjay Raut (@rautsanjay61) February 16, 2018
पैसे बॅंक मे रखो तो
नीरव मोदी का डर..
घर मे रखो तो नरेंद्र मोदी का..— Sanjay Raut (@rautsanjay61) February 15, 2018
शुक्रवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातूनही या घोटाळ्यावर भाष्य करण्यात आले आहे. देशातील बँक घोटाळ्यांचा प्रवास केतन पारेख ते नीरव मोदी व्हाया विजय मल्ल्या असा सुरुच आहे. या प्रवासात बँक व सरकारचे हजारो कोटी बुडाले आणि घोटाळा करणारे मध्येच उतरून फरार झाले किंवा जामिनावर मोकळे सुटले. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार तुरुंगात जाणार की तेदेखील जिवाचा मल्ल्या करून घेण्यात यशस्वी होणार?, असा सवालच शिवसेनेने विचारला आहे.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी राज्यातील सहकारी बँका बदनाम झाल्या. आता राष्ट्रीयकृत बँकांनी काय दिवे लावले, पंजाब नॅशनल बँकेतील प्रकरण २०११ मधील असून हे प्रकरण २०१८ मध्ये बाहेर आले. मग सात वर्षे नेमकी कोणती कारवाई झाली? प्रत्यक्ष गुन्हे दाखल व्हायला, छापे मारण्यासाठी इतकी वर्षे का लागली?, असा सवालही शिवसेनेने विचारला आहे. डिजिटल प्रणालीमुळे घोटाळ्यांना आळा बसण्याचे दावेही पोकळ ठरत असल्याचे या घोटाळ्यातून स्पष्ट होते, असे अग्रलेखात म्हटले आहे.