यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा कृतज्ञता पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी ही माहिती दिली.
२४ जानेवारीला सोनई येथे सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. प्रत्येकी एक लाख रूपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. प्रशांत गडाख यांनी सांगितले की, समाजसेवक, शास्त्रज्ञ, लेखक, कलावंत अशा प्रतिभावानांच्या योगदानातून समाज प्रगतीची वाटचाल करतो. या प्रतिभावानांच्या ऋणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा संस्थेचा उद्देश आहे.
गेल्या वर्षी हा उपक्रम सुरू करण्यात आला. पहिल्याच वर्षी हिंदी-उर्दू साहित्यिक कवी गुलजार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि कोल्हापूर येथील हेल्पर्स ऑफ हँडिकॅप्ड या संस्थेच्या प्रमुख डॉ. नसीमा हुरजूक यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र घराघरात पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आदिवासींसाठी जीवन समर्पित केलेले आमटे दांपत्य आणि देशाच्या अणुऊर्जा निर्मितीत भरीव योगदान दिलेले शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2014 रोजी प्रकाशित
पुरंदरे, काकोडकर व आमटे दांपत्याचा गौरव
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा कृतज्ञता पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि ज्येष्ठ समाजसेवक
First published on: 19-01-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purandare kakodkar amte couple awarded