धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वर पडलेल्या जीवघेण्या खड्डय़ांविरोधात शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील येडशी चौकात सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अर्धा तास चाललेल्या आंदोलनानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास अखेर जाग आली. महामार्गावरील खड्डे १० दिवसांत बुजविण्याचे आश्वासन या विभागाने दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शिवसेनेचे आमदार ओम राजेिनबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. धुळे-सोलापूर मार्गे उस्मानाबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११वर गेल्या काही महिन्यांपासून मोठे खड्डे पडले आहेत. खड्डय़ांमुळे पादचाऱ्यांसह सर्वानाच जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. खड्डय़ांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत अनेकांचा या खड्डय़ांनी बळी घेतला आहे. शिवाय अनेकांना अपघातामध्ये पाय, हात गमवावे लागले आहेत.
या खड्डय़ांबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कळवूनही दखल घेतली नाही. या पाश्र्वभूमीवर सोमवारी सकाळी ११ वाजता हे आंदोलन करण्यात आले. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सूरज साळुंके, नगरसेवक सोमनाथ गुरव, भारत इंगळे, राजाभाऊ घोडके, गणेश जमाले, दगडू कोरे यांच्यासह महायुतीचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून १० दिवसांत राष्ट्रीय महामार्गावरून खड्डे बुजवून घेण्यात येतील व महामार्गाची दुरुस्ती केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.