नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील धरणांमधून मराठवाडय़ातील जायकवाडीला पाणी सोडण्याचे तीव्र पडसाद नगर जिल्ह्यात उमटले आहेत. राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांचे दरवाजे तोडून स्थानिक शेतकऱ्यांनी मंगळवारी शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यातच राहुरी तालुका व विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय नेते एकवटल्याने या आंदोलनाला व्यापक स्वरूप आले. या प्रकरणी मंगळवारी सायंकाळपर्यंत सुमारे चारशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुळा धरणातून आज (बुधवार) जायकवाडीत तीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे, पण जायकवाडीत पाणी गेले तर मुळाच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी एकही आवर्तन होऊ शकणार नसल्याचा उद्रेक आज उफाळून आला. शेतकऱ्यांनी कुलपे तोडून धरणाचे चाक फिरवून डावा व उजव्या कालव्यात पाणी सोडले. ते बराच वेळ सुरू होते. सायंकाळी आंदोलक निघून गेल्यानंतर हे कालवे बंद करण्यात आले. मुळा धरणावर तहसीलदार राजेंद्र वाघ, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता बी. एम. बोडखे, कांबळे व प्रचंड फौजफाटय़ासह पोलीस उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे, निरीक्षक रजपूत व उपनिरीक्षक भिसे उपस्थित होते.
नगर जिल्ह्य़ातील मुळा व भंडारदरा आणि नाशिक जिल्ह्य़ातील दारणा या तीन धरणांमधून मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात प्रत्येकी तीन याप्रमाणे ९ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला असून त्यावर नगर व नाशिक जिल्ह्य़ात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आंदोलकांनी दोन्ही कालव्यांचे चाक फिरवून पाणी सोडले. गोळ्या झेलू, प्रसंगी रक्त सांडू, पण आधी मुळाचे आवर्तन केल्याशिवाय जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. आमदार कर्डिले यांनी जायकवाडीत पाणी सोडताना आमदारांना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतले नाही. त्यामुळे आता तुरुंगात गेले तरी चालेल, आमदारकी गेली तरी चालेल, पण पाण्यासाठी लढत राहू, असा इशारा दिला. आमदार कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देण्यात आली. सरकार काँग्रेसचे असले तरी काँग्रेसचा आमदार पाण्यासाठी तुरुंगात जायला तयार आहे, पण आता जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. लाभक्षेत्रात पाणी हाच शेतकऱ्यांना न्याय आहे, तो मिळेपर्यंत आता माघार नाही, असे तनपुरे म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2012 रोजी प्रकाशित
पाणीवाटपावरून कालवा
नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील धरणांमधून मराठवाडय़ातील जायकवाडीला पाणी सोडण्याचे तीव्र पडसाद नगर जिल्ह्यात उमटले आहेत. राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांचे दरवाजे तोडून स्थानिक शेतकऱ्यांनी मंगळवारी शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

First published on: 28-11-2012 at 04:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Qurrel on water supply and distribution