राहाता:महसूल विभाग सर्वसामान्यांशी जोडलेला विभाग आहे. महसुल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेने आणि चांगल्या संवादाने काम करून जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ‘महसूल सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
यावेळी माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, भाजपचे अध्यक्ष रविंद्र गोंदकर आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, महसूल मंत्री असताना महसूल पंधरवड्याची संकल्पना प्रथम राबवली होती. त्याअंतर्गत सैनिक हो तुमच्यासाठी सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे सैनिकांचे प्रश्न सोडविण्यात आले. खंडकऱ्यांच्या जमिनीचे प्रश्न मार्गी लागले. शेती महामंडळाच्या जमिनी विविध शासकीय उपक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. गायरान जमिनींचा वापर घरकुलांसाठी करण्यात आला. तसेच भोगवटा २ मधील नोंदी भोगवटा १ मध्ये करण्यात आल्या.
महसूल सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी त्या ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्या. नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल कर्मचारीच नागरिकांना सर्वप्रथम मदतीसाठी धाव घेतो. त्यामुळे या विभागाचे कार्य अधिक महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांकडे विशेष लक्ष द्यावे. ओढे-नाल्यावरील अतिक्रमणे स्वतःहून दूर करावीत, असे आवाहन करून महसूल विभागाच्या अनेक सुविधा ऑनलाईन सुरू झाल्याने पारदर्शी कारभार होण्यास मदत झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान व लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जात प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ, जीवंत सातबारा मोहीम, शर्तभंग जमीन नियमाकुल करणे, स्वामित्व योजनेंतर्गत सनद, एग्रीस्टॅक योजनेतील शेतकऱ्यांना ओळखपत्र व भोगवटा २ चे १ मध्ये रूपांतर करण्याच्या आदेशाचे वाटप तसेच, अस्तगाव, चोळकेवाडी, पडसवाळ या तीन किमी. शिव रस्त्याच्या मोजणी नकाशाचे वाटप विखे यांच्या हस्ते करण्यात आले. जांभुळवाडी (संगमनेर) या नव्या महसूली गावाच्या अधिसूचनेचे वितथण ग्रामस्थांना करण्यात आले.
यावेळी आण्णासाहेब म्हस्के, अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर यांची भाषणे झाली. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी केले.
भंडारदरा व मुळामध्ये अतिरिक्त १० टीएमसी पाणी
जायकवाडी धरण ५० वर्षांत प्रथमच पूर्ण क्षमतेने भरले. गोदावरी नदीतून पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणातून कालव्यांमध्ये मुबलक पाणी सोडले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मुळा व भंडारदरा धरणांमध्ये प्रत्येकी १० टीएमसी पाणी आणण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे, असे मंत्री विखे म्हणाले.