आ. बाळासाहेब थोरात बोलायला लागले, हे बरे झाले. ते बोलके झाले, याचाच मला आनंद आहे. आता त्यांनी विधानसभेच्या सभागृहातही बोलावे. राष्ट्रवादीचे मधुकर पिचड यांनीही त्यांच्या पक्षाच्या गटनेते जयंत पाटलांनी सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय केले याची माहिती घेऊन आत्मपरीक्षण करावे, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने विजय मिळवल्यानंतर विखे यांनी भाजप-सेनेसमवेत आघाडी स्थापन केल्याबद्दल जोरदार टीका केली होती. त्याला विखे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. सांगलीसह औरंगाबाद, ठाणे, नांदेड आदी ठिकाणी राष्ट्रवादीने जिल्हा बँकेसाठी भाजप व इतर पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली ती काय पिचड यांना विचारूनच का, असा प्रश्नही विखे यांनी उपस्थित केला. सहकारात पक्षीय राजकारण होत नाही, याचा विखे यांनी पुनरुच्चार केला.
थोरात व पिचड या दोघांनाही बँकेत आपले संचालकांचे संख्याबळ कमी झाल्याचे शल्य जाणवत असावे, दु:ख झालेले दिसते. ही पिछेहाट का झाली याचेही आत्मपरीक्षण त्यांनी करावे, असेही विखे म्हणाले. राजीव राजळे यांच्या भूमिकेबाबत बोलताना विखे यांनी प्रत्यक्ष अध्यक्षपदाच्या निवडीवेळी कोण कोणाबरोबर आहे, हे स्पष्ट होईलच, असे उत्तर दिले.
अध्यक्षपदाची निवडणूक आघाडी लढवणार का, यासंदर्भात बोलताना विखे यांनी सांगितले, की लोकशाहीत सर्व पर्याय खुले असतात. सत्ता कोणाची यापलीकडे जाऊन बँकेचे काही प्रश्न आहेत. आर्थिक शिस्त निर्माण होण्याबरोबरच आधुनिकीकरणही हवे आहे. आर्थिक क्षेत्रात होणारे बदलही बँकेने स्वीकारायला हवे. त्यासाठी कार्यपद्धती बदलायला हवी. अनेक अर्बन बँका आता जिल्हा बँकेच्या पुढे जाऊ लागल्या आहेत. जिल्हा बँकेने व्यवसायात वाढ करायला हवी, सरकारच्या पॅकेजपेक्षा स्वत: बँकेने शेतक-यांच्या व्याजात काही सवलत दिली पाहिजे.