Radhakrishna Vikhepatil on Sharad Pawar & Ethanol Policy : जलसंपदा मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी (१४ ऑगस्ट) धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टीका केली होती. मात्र, ही टीका करत असताना त्यांचा रोख उपमुख्यमंत्री व त्यांचे महायुतीमधील सहकारी अजित पवारांकडे देखील होता असं बोललं जात आहे. विखे यांनी दोन्ही पवारांवर टीका केल्याचा दावा केला जात होता. मात्र, विखे पाटलांनी आज प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, “मी अजित पवारांवर कधी टीका करत नाही. माझं वक्तव्य महाराष्ट्रातील जाणत्या राजाबद्दल होतं.”
“ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इथेनॉल धोरण लागू करून कारखान्यांना जीवदान दिले त्यांचे कारखान्यांच्या सभेत अभिनंदनाचे बॅनर आणि फोटो तरी लावा”, असं विखे पाटील यांनी म्हटलं होतं. विखे यांचं हे वक्तव्य शरद पवार व अजित पवार या दोघांसाठी होतं असं बोललं जात होतं. मात्र, राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं की माझं ते वक्तव्य शरद पवारांसाठी होतं.
नेमकं काय घडलं होतं?
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटबाबत वक्तव्य करताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवारांवर टीका करताना ‘निदान जनाची नाही तर मनाची तरी बाळगा’, असं वक्तव्य केलं होतं. ज्या मोदी व शहांनी कारखाने वाचवले त्यांचे बॅनर तरी लावा असं विखे पाटील म्हणाले होते. यावर विखे पाटलांनी आज स्पष्टीकरण दिलं.
राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टीकरण देत म्हणाले…
कालच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत आपण अजित पवारांना नव्हे तर राज्याच्या ‘त्या’ जाणत्या राजाबद्दल बोलल्याचे सांगितले. विखे पाटील म्हणाले, “अनेक वर्षे आपल्या राज्यातील जाणते राजे हे फक्त आम्हाला घेऊन फिरायचे. तुम्ही केंद्रात कृषीमंत्री राहिलात, त्यावेळी तुम्ही ना आयकर माफ करु शकलात, ना इथेनॉल धोरण आणू शकलात. पहिले इथेनॉल धोरण तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी आणलं. त्यांनी ५ टक्के धोरण लागू केलं. जाणत्या राजांनी १० वर्षे काय केलं? हा प्रश्न माझा आहे. “
जलसंपदा मंत्री म्हणाले, “इथेनॉल धोरणामुळे कारखानदारी टिकली त्याबद्दल सरकारचे आभार मानायला हवे. म्हणून मी माझ्या भाषणात ‘मनाची नाही तरी निदान जनाची ठेवा’ असं बोललो. माझं हे वक्तव्य अजित पवारांना उद्देशून नव्हतं. अजित पवारांवर मी कधीच टीका करत नाही. तर, वर्षानुवर्षे महाराष्ट्राला फसवणाऱ्या त्या जाणत्या राजाबद्दल मी बोललो होतो.