दुर्मीळ व लुप्त होत जाणाऱ्या प्रजातीची नोंद घेणाऱ्या आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) लाल यादीत अत्यंत धोकादायक श्रेणीत चिमण्यांची नोंद झाली आहे. मोबाइल टॉवर्समधून निघणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन प्रामुख्याने त्यासाठी कारणीभूत ठरले असून, ही स्थिती अशीच कायम राहिल्यास चिमण्या पूर्णपणे नाहीशा होण्याचा धोका या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, अँड्रॉईड, आयफोन्स, ब्लॅकबेरी यासारख्या अत्याधुनिक फोनमधून निघणारी किरणे नैसर्गिक जगतावर परिणाम करीत आहेत. चिमण्या किंवा मधमाशांचे नष्ट होणे ही एक सुरुवात आहे. सर्वाधिक मोबाइल वापरणाऱ्यांमध्ये चीनच्या पाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. त्यामुळे भारतात मोबाइल टॉवर्सची संख्याही वाढली आहे. पर्यावरण रक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या चिमणीला विद्युत चुंबकीय उत्सर्जनाबरोबरच हवामान बदल आणि प्रदूषण याचाही धोका वाढला आहे.
आययूसीएनच्या लाल यादीत प्रथमच चिमणीची नोंद झाली असली तरीही इतर पक्ष्यांप्रमाणे चिमण्यांच्या या स्थितीवर फारसे संशोधन झालेले नाही. गुवाहाटीत चिमण्यांवर दोन संशोधने, नेचर्स डिकॉनचे हिरेन दत्ता यांचे संशोधन, निसर्ग अभ्यासक सारिका हिचे स्वतंत्र संशोधन वगळता संशोधने नाहीत. २०१०मध्ये ‘अ पॉसिबल इम्पॅक्ट ऑफ कम्युनिकेशन टॉवर्स ऑन वाइल्डलाइफ अँड बीज’ हे संशोधन प्रसिद्ध झाले. सतत एक तास चिमण्यांच्या अंडय़ावर विद्युत चुंबकीय उत्सर्जनाचा मारा केल्यानंतर अंडय़ातील गर्भ नष्ट झाला. किरणांमुळे चिमण्याच्या सुसंवादावर परिणाम होऊन त्या उग्र झाल्या. त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाल्याचे या संशोधनात तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
केंद्राकडून दखल
या अहवालाची दखल केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने घेत मोबाइल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय उत्सर्जनाचा समावेश प्रदूषणात केला. टेलिकॉम विभागाने मोबाइल हँडसेट व टॉवर्ससाठी नवे नियम जाहीर केले. त्यानुसार विद्युत चुंबकीय उत्सर्जन २ व्ॉट/केजीवरून १.६ व्ॉट/केजी इतके कमी करण्यात आले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी रेडिएशन टॉवर्स या नव्या मानकानुसार एक किलोमीटर अंतराच्या आत नव्या टॉवर्सना मनाई आहे. हा कायदा मोडल्यास पाच लाख रुपयाच्या दंडाचीही तरतूद आहे. मात्र, तरीही चिमण्यांसोबतच इतरही पक्ष्यांना धोका कायम आहे.