पक्षसंघटनेच्या बळकटीकरणासाठी काँग्रेसचे ‘युवराज’ राहुल गांधी मंगळवारी नागपुरात एक दिवसासाठी राहणार असले तरी त्यांच्या दौऱ्यात अतिवृष्टीग्रस्त शेतक ऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी अमरावती मार्गावरील सुराबर्डी येथील शानदार पंचतारांकित फार्म हाऊसची निवडही चर्चेचा विषय झाला आहे.
राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या तारखांबाबत असलेली अनिश्चितता दूर झाली असून मंगळवारी, एक दिवसासाठी ते नागपुरात येणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी स्पष्ट केले. राहुल गांधींच्या सुरक्षेचा एसपीजीच्या पथकाने शुक्रवारी आढावा घेतला. या पथकाने सुराबर्डीतील फार्म हाऊस परिसराची कसून पाहणी केली. त्यानंतर या जागेवर बैठक घेण्यासाठी हिरवी झेंडी दाखविण्यात आली. शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही परिसराचा दौरा केला. बैठकीचा अजेंडा काँग्रेसच्या बळकटीकरणावर केंद्रिभूत असल्याने राहुल गांधींचा विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्याचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी अतिसुरक्षेतील ‘बंद’ फार्म हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
सुराबर्डीतील फार्म हाऊस प्रख्यात सीए बी.के. अग्रवाल यांच्या मालकीचे असून २० एकरावर पसरलेल्या या फार्म हाऊसमध्ये २४ आलिशान सूट, एक तलाव, पाच कॉटेजेस आणि लाऊंज आहे. फार्म हाऊसचे एक दिवसाचे भाडे ६ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. येथे १ हजार रुपये प्लेटप्रमाणे खाण्याचा दर आकारला जातो. राहुल गांधींनी फक्त निवडक पदाधिकाऱ्यांशीच चर्चा करण्याची तयारी दर्शविली असून, फक्त ५५ निमंत्रितांनाच बैठकीत प्रवेश राहणार असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी राहुल गांधींचे नागपुरात आगमन होणार असून ते थेट वध्र्याला रवाना होतील. रात्रीचा मुक्काम बापूकुटीत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी भारतीय युवक काँग्रेसच्या बैठकीत हजेरी लावून लगेच नागपूरला रवाना होतील. वर्धा येथे भारतीय युवक काँग्रेसची २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान बैठक होत असून, राहुल गांधी बैठकीला हजेरी लावणार आहेत. वध्र्याहून निघाल्यानंतर मंगळवारी सकाळी १० वाजता ते सुराबर्डीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पोहोचतील, अशी माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. नागपूर आणि वध्र्याच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधींजवळ शेतक ऱ्यांना भेटण्याचे कोणतेही शेडय़ुल नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
विदर्भात सलग तीन महिने अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट घोंघावत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १९३४ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यांच्या भेटीनंतर केंद्रीय पथकाचे सदस्य आणि पथकापाठोपाठ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारही विदर्भाच्या दौऱ्यावर येऊन गेले. मात्र शेतकऱ्यांना मदतीच्या आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडलेले नाही. राहुल गांधी शेतकऱ्यांना भेटतील, अशी अपेक्षा होती. परंतु काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना त्यांचे मन वळविण्यात यश आले नाही, अशी टीका विदर्भ जन आंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.