वीर सावरकर यांचा अपमान मणिशंकर अय्यर यांनी केला होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. काल सभेत वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणणारे अशी हिंमत दाखवणार का? राहुल गांधी यांच्या पुतळ्याला थोबाडित मारणार का? तुम्ही (उद्धव ठाकरे) वीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? ते तरी सांगा असाही प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून विचारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

वीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. देशभक्तांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने वावरण्याचा, निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा अपमान जाणीवपूर्वक केला जातो आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

वीर सावरकर हे महाराष्ट्राचंच नाही देशाचं दैवत

वीर सावरकर हे फक्त महाराष्ट्राचं दैवत नाही तर संपूर्ण देशाचं दैवत आहेत. अशा दैवताचा अपमान केला जातो आहे. जाणीवपूर्वक केला जातो आहे. विधानसभेत आपण पाहिलं की हिंदुत्व हिंदुत्व करणाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याविषयी एक शब्दही काढला नाही. उलट राहुल गांधींची खासदारकी कायदेशीर मार्गाने गेली तरी काळ्या फिती लावून काँग्रेसला साथ देणारे हेच लोकं आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले. वीर सावरकरांचा अपमान झाला तेव्हा यांचे नेते मूग गिळून गप्प होते यापेक्षा मोठं दुर्दैव काय? कालच्या सभेत आम्ही वीर सावरकर यांचा अपमान करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? हे एकदा त्यांना विचारा. मणिशंकर अय्यर यांनी जेव्हा वीर सावरकरांचा अपमान केला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. तशी हिंमत तुम्ही दाखवणार का?असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.

राहुल गांधी यांची लायकी आहे?

राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावं. मात्र ते तसं करणार नाहीत कारण त्यांच्याकडून ती अपेक्षाच नाही. ते सांगतात मी सावरकर नाही गांधी आहे. ते सावरकर होऊच शकत नाहीत त्यांची लायकीच नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. आपल्या देशाची निंदा राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी दुषणं दिली. आम्ही पुन्हा एकदा वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या आणि आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांचा निषेध करतो असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीर सावरकर गौरव यात्रा राज्यभरात काढली जाणार

राहुल गांधी जे बोलले त्यामुळे जनतेच्या मनात चिड आहे. मी वीर सावरकर यांच्या त्यागाविषयी मी आणखी काय सांगू ते आपल्याला माहित आहेच. जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरा शहरांमध्ये वीर सावरकर गौरव यात्रा आम्ही सुरू करणार आहोत असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.वीर सावरकर यांच्याविषयी जे बोललं गेलं त्यामुळे जनतेच्या मनात चीड आहे.