देशात दोन-तीन उद्योगपतींचे सरकार हवे, की गोरगरिबांच्या हिताचे, याचा निर्णय या निवडणुकीत जनतेस घ्यायचा आहे, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथील प्रचारसभेत सांगितले. गरिबांना विनामूल्य आरोग्य सेवा, गरजूंना मजबूत निवारा आणि पेन्शन योजना यूपीए-तीन सत्तेत आल्यावर राबविण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
जालना मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करून गांधी म्हणाले, की त्यांच्या भाषणातून फक्त राग दिसतो. एखाद्याची उणी-दुणी ते काढतील. परंतु चांगले काही असेल तर बोलणार नाहीत. आम्ही प्रेमाने व शिष्टाचार सांभाळून बोलतो. विरोधी पक्षीय मंडळींनीही तसेच वागले पाहिजे.
नवी दिल्लीत भाजपच्या पोस्टरवर ‘महिलाओं को शक्ती देना है’ अशी घोषणा आपण पाहिली. परंतु भाजपचेच मुख्यमंत्री असलेल्या मध्य प्रदेशात २० हजार महिला बेपत्ता आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री महिलांचे फोन टेप करतात आणि पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लावतात. महिलांना प्रतिष्ठा देण्याची भाषा पोस्टरवर करणे सोपे असते. परंतु प्रत्यक्षात तशी कृती करणे मात्र सोपे नसते. विधिमंडळात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा आमचा प्रस्ताव केवळ भाजपने संसदेचे अधिवेशन चालू न दिल्यामुळेच बारगळला.
एखाद्या राज्याच्या प्रगतीत तेथील जनतेचाही सहभाग असतो. परंतु गुजरातच्या संदर्भात मोदी म्हणतात, की जनतेने काही केले नाही. मी एकटय़ाने प्रगती केली. अदानीकडे १० वर्षांपूर्वी ३ हजार कोटींची संपत्ती होती, ती आता ४० हजार कोटींची आहे. शेतकऱ्यांची ४५ हजार एकर जमीन गुजरात सरकारने एक रुपया चौरस मीटर दराने दिली. त्यामुळे जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची उपासमार होत आहे. आम्हाला गरिबांच्या हिताचे सरकार हवे आहे. क्रोध आणि द्वेष पसरविल्याने देश प्रगती करणार नाही तर थांबेल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी एकाधिकारशाह असून ही प्रवृत्ती देशास परवडणारी नसल्याचे सांगितले. पालकमंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, उमेदवार औताडे उपस्थित होते.