चारा छावणीवर पंजा निशाणी असलेला झेंडा चढला. मजुरांना ऑनलाइन जॉबकार्ड मिळाले. चारा छावण्यांमध्ये फुफाटा उडू नये, म्हणून रात्रीच टँकरने पाणी फवारले गेले. शेतकऱ्यांनीही जनावरे स्वच्छ केली. एकाच्या ढोपरालाही शेण दिसू नये याची काळजी घेण्यात आली.. काँग्रेसचे ‘युवराज’ असलेले उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आगमनाच्या निमित्ताने दुष्काळी मराठवाडय़ात मंगळवारी जणू ‘बैलपोळा’ साजरा झाला! औरंगाबाद जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर राहुल गांधी यांनीही मग ‘मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत,’ असे प्रशस्तिपत्रक तातडीने देऊन टाकले.
मंगळवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी औरंगाबाद जिल्ह्य़ातील पिंपळगाव, निधोना, बाबरा, गणोरी या दुष्काळग्रस्त भागांना भेट दिली. प्रशासनानेही राहुल यांनी कोणत्या गावाला जायचे, कोणाशी चर्चा करायची, कोठे उभे राहायचे याचे नियोजन केले. चारा छावण्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारीही आवर्जून हजर होते. विशेष म्हणजे त्यांच्याकडे औषधेही होती.  रस्त्याच्या शेजारीच रोजगार हमी योजनेतून बांधबंदिस्तीची कामे हाती घेण्यात आली. हे काम महिनाभरापासून सुरू आहे, असे मजुरांनी सांगितले. मजुरांनीही या वेळी बरोबर जॉब कार्ड आणले होते. कोणी काही विचारायच्या आत मजूर जॉब कार्ड समोरच्या व्यक्तीच्या हाती ठेवत.  
पुढे राहुल गांधींचा ताफा बाबरा गावातील चारा छावणीवर आला. छावणीवरील जनावरांना मंगळवारी सकाळीच शेतकऱ्यांनी स्वच्छ धुवून काढले, चारा-पेंड टाकली.  येथील छावणीत शेतकऱ्यांशी राहुल गांधींनी चर्चा केली. सुरुवातीला काही काँग्रेस कार्यकर्त्यांनीच माइकचा ताबा घेऊन सरकारच्या ‘कामांची’ स्तुती सुरू केली. राहुल यांनीच त्यांना रोखले आणि शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या विचारल्या. पण, गावकऱ्यांनी अडचण मांडली, की त्याचे उत्तर मात्र मुख्यमंत्री चव्हाण देत होते. असे करत करतच राहुल यांनी पुढच्या गावाकडे प्रयाण केले आणि सरतेशेवटी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक करून निरोप घेतला.