शहर व तालुका परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा ठपका ठेवत सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी अवैध धंद्यांच्या अड्डय़ावर स्वत:च छापा टाकण्याचा प्रकार सध्या चर्चेचा विषय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री असल्याने भुसे यांनी केलेले कृत्य भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेले मटका, जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह दोघांना पोलिसांच्या हवाली करतानाच राज्यमंत्र्यांनी शनिवारी रात्री येथील गांधी पुतळ्याजवळ आंदोलनही केले.
काही दिवसांपासून शहर परिसरात अवैध धंद्यात वाढ झाली असून त्यासंदर्भात लक्ष वेधूनही पोलिसांकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याची भुसे यांची तक्रार आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांशीही दोन वेळा चर्चा झाली. परंतु, तरीदेखील कोणतीही कारवाई झाली नसल्याचे भुसे यांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर शनिवारी सायंकाळनंतर चाळीसगाव फाटय़ाजवळ एका ठिकाणी मटका व पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती भुसे यांना मिळाली. त्यानुसार कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल होत त्यांनी छापा टाकला. भुसे व त्यांच्या कार्यकर्त्यांना बघताच अनेक जुगाऱ्यांनी धूम ठोकली. सलीम अहमद व राजेश मोरे या दोघांना कार्यकर्त्यांनी पकडले. या कारवाई दरम्यान तेथून जवळच असलेल्या भरडाई माता मंदिर परिसरातील एका घरातही जुगार सुरू असल्याची माहिती समजल्यावर राज्यमंत्री व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिकडे धाव घेतली. या दोन्ही ठिकाणी मिळालेले मटक्याचे साहित्य, पत्त्यांचा कॅट, नोंदी असणाऱ्या वह्य़ा, रोख रक्कम असा मुद्देमाल एका पोत्यात भरून येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आणण्यात आले. या ठिकाणी अवैध धंद्यांविरुद्ध ठोस कारवाई व्हावी म्हणून भुसे यांनी आंदोलन सुरू केले. या वेळी तेथे उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु, जिल्हा पोलीस प्रमुखांनी ठोस आश्वासन दिल्याखेरीज आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका भुसे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली. अखेरीस मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी अवैध धंद्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात सेनेचे तालुकाप्रमुख अ‍ॅड. संजय दुसाने, महानगरप्रमुख रामा मिस्तरी, कैलास तिसगे, भरत देवरे, नीलेश आहेर आदी सामील झाले होते.
दरम्यान, राज्यात सत्ताधारी असलेले भाजप आणि शिवसेनेचे एकमेकांशी असलेले ‘मधुर’ संबंध पाहता भुसे यांनी टाकलेला छापा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष करून या छाप्यामुळे भाजप पदाधिकारी चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. भुसे यांची कृती म्हणजे सवंग लोकप्रियतेसाठी उचलण्यात आलेले पाऊल असल्याची टीकाही केली जात आहे. भुसे हे सत्ताधारी पक्षातील मंत्री असताना त्यांच्यावर छापा टाकण्याची आणि ठिय्या देण्याची वेळ येत असल्याबद्दल विरोधी पक्षांकडून आश्चर्य व्यक्त केरण्यात येत आहे.