यंदाच्या मोसमात सातत्याने पडणाऱ्या पावसाने दोन महिन्यांतच सरासरी तीन हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. आज अखेर जिल्ह्य़ात ३०२९.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने दीर्घकालीन निरीक्षणाच्या आधारे केलेल्या नोंदीनुसार रत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाची वार्षिक सरासरी ३३६४.२ मिलीमीटर आहे. पण यंदा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या पावसाने गेल्या पावणेदोन महिन्यांत मोजकेच दिवस विश्रांती घेतली. गेले आठ दिवस तर संततधार पावसामुळे जिल्ह्य़ाची रोजची सरासरी ८० ते १०० मिलीमीटर राहिली. त्यामुळे पावसाळय़ाच्या चार महिन्यांपैकी पहिल्या दोन महिन्यांतच वार्षिक सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. उरलेल्या दोन महिन्यांत पडणारा पाऊस लक्षात घेता यंदा जिल्ह्य़ात वार्षिक सरासरीचा नवा विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठ वर्षांतील पावसाच्या वार्षिक सरासरीच्या नोंदीवर नजर टाकली तर असे दिसून येते की, २००७ (४१६४ मिमी), २०१० (४१२९ मिमी) आणि २०११ (४६८० मिमी) या तीनच वर्षी पावसाने चार हजार मिलीमीटर सरासरीचा टप्पा ओलांडला आहे. २००९ मध्ये सर्वात कमी सरासरीची (२८३७ मिमी) पावसाची नोंद झाली आहे. तसेच यंदा जिल्ह्य़ातील नऊ तालुक्यांपैकी सहा तालुक्यांमध्ये सरासरी तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत एकाही तालुक्यात दोन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला नव्हता.
पावणेदोन कोटी रुपयांचे नुकसान
दरम्यान गेले आठ दिवस पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे जिल्ह्य़ात ४०७ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये संगमेश्वर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून नदीकिनारी असलेल्या शेतांमध्ये पुराचा गाळ साचल्यामुळे जमीन नापीक होण्याची भीती आहे. तसेच आंबा, नारळ, सुपारी, काजूच्या फळबागांचेही नुकसान झाले आहे. या पावसामुळे घरे, गोठे, दुकाने आणि सार्वजनिक मालमत्तेचे एकूण सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत तेराजणांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू ओढवला आहे.
पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या उधाणाचे स्वरूपही यंदा जास्त उग्र झाल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावरील घरे आणि माडाच्या बागांना या उधाणाचा फटका बसला आहे. विशेषत: गेल्या पौर्णिमेपासून (२२ जुलै) तीन दिवस त्याची जास्त तीव्रता होती. रत्नागिरी शहराच्या समुद्रकिनाऱ्यालगत मांडवी, मिऱ्या, काळबादेवी, दापोली तालुक्यात हर्णे, आंजर्ले, पाचपांढरी इत्यादी ठिकाणी घरे, रस्ते आणि नारळ-सुपारीच्या बागांचे या उधाणामुळे जास्त नुकसान झाले आहे.
संपूर्ण कोकणपट्टीला झोडपून काढणाऱ्या या पावसाचा जोर कालपासून मात्र ओसरला आहे. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी सुमारे आठवडाभरानंतर सूर्यदर्शन झाले. ही परिस्थिती आणखी काही काळ टिकून राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असल्यामुळे कोकणवासीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.