तालुक्याच्या बहुतांश भागात पंधरा दिवसांपासून पाऊस नसला तरी घाटघर, रतनवाडी परिसरात मात्र मान्सूनचे पुनरागमन झाले आहे. चोवीस तासांत घाटघरला ४४ मिमी पाऊस पडला. भंडारदऱ्यात मात्र पावसाळी वातावरण असले तरी पावसाचे प्रमाण अगदीच तुरळक आहे.
दीर्घ कालावधीनंतर तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे, मात्र घाटघर, रतनवाडी, पांजरे या तीनचार गावांचा अपवाद वगळता अन्य ठिकाणी पाऊस नाही. घाटघर ४४ मिमी, रतनवाडी ४८ मिमी तर पांजरे येथे १८ मिमी पावसाची नोंद झाली. भंडारदऱ्यात फक्त दोन मिमी पाऊस पडला. भंडारदऱ्याच्या पाण्याने आता तळ गाठला असून शुक्रवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठा ५०८ दशलक्ष घनफुटापर्यंत कमी झाला होता. घाटघर परिसरात गुरुवारी झालेल्या पावसात बारा तासांत धरणात चार दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. धरणातून सध्या ४६५ क्युसेकने  विसर्ग सुरू आहे.